वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे लिंगायत स्मशानभूमीच्या जागेच्या मालकीच्या वादातून माजी सरपंच रामचंद्र औंधे यांच्या पत्नी रुक्मिणी रामचंद्र औंधे (वय ७८) यांचा मृतदेह दफन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. ग्रामस्थ व प्रशासनाने या दफनभूमीजवळ पर्यायी चार गुंठे जागेत दफनविधीचा तोडगा लिंगायत समाज बांधवांना अमान्य झाल्याने तब्बल २४ तासानंतर औंधे यांच्या घराच्या आवारातच दफनविधी करण्यात आला.
रविवारी २६ जानेवारीरोजी दुपारी १२ वाजता रुक्मिणी औंधे यांचे निधन झाले. वांगी येथील लिंगायत समाज हा १५९९/२४६९ या गट क्रमांकावरील जमिनीत दफन करीत होता, मात्र परंपरागत स्मशानभूमीची ही जमीन खासगी मालकीची आहे. याप्रकरणी लिंगायत समाजाने वर्षभरापूर्वी प्रांताधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी याबाबत कठोर पवित्रा घेतल्याने पोलीस संरक्षणात मृताचे दफन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा दफन विधीस प्रतिबंध झाल्याने नातेवाईकांनी कडेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवला. अंत्यसंस्कारासाठी जागेच्या मागणीसाठी मृतदेह रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले.लिंगायत समाजाच्या परंपरागत दफनभूमीत दफनविधीस काही लोकांचा विरोध असून, यावर तोडगा निघावा, अशी विनंती नातेवाईकांनी प्रांताधिकारी गणेश मरकड यांच्याकडे केली.
यावर प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ तोडगा काढू, असे आश्वासन दिले. हा प्रकार समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले. तहसीलदार शैलजा पाटील, प्रांताधिकारी मरकड, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक एस. के. गोसावी यांनी वांगीत जाऊन दफनासाठी जागा देण्यास नकार देणाºयांना समजावण्याचा रात्रभर प्रयत्न केला; मात्र हा प्रश्न सुटला नसल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण निरीक्षक श्रीकांत पिंगळे पोलीस फौजफाट्यासह गावात उपस्थित झाले. जमिनीच्या मालकी हक्काचा वाद सुटला नसल्याने संबंधित जागा महसूल विभागाने ताब्यात घेतल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी औंधे यांचा मृतदेह वांगी येथील दफनभूमीत आणला असता, दुसºया गटाने दफनविधीला विरोध दर्शवला. दोन गटात तणाव निर्माण झाला.
यावर तोडगा निघत नव्हता. रविवारी रात्री दहापासून नातेवाईक व लिंगायत समाजबांधव दफनभूमीजवळच रस्त्यावर मृतदेह ठेवून बसले होते. दरम्यान, दफनविधीला विलंबामुळे मृतदेहाची अवहेलना होत असल्याने संताप व्यक्त होऊ लागला. प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागवला. दंगलनियंत्रण पथकही वांगीत आले. नातेवाईकांना रविवारची रात्र मृतदेहाजवळ बसून जागून काढावी लागली. सोमवारी दुपारपर्यंत तोडगा निघत नव्हता. अखेर प्रशासनाने या दफनभूमीजवळच त्याच गटात असलेल्या पर्यायी जागेचा तोडगा सुचविला. मात्र नातेवाईक व लिंगायत समाजबांधवांनी संताप व्यक्त करून पर्यायी जागेत दफनविधीस नकार दिला. अखेर सोमवारी दुपारी दोन वाजता मृत महिलेच्या घराच्या आवारातच दफनविधी केला.याबाबत महसूल विभागाकडून भूमी संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगितले.
- जागेला कुंपण
वांगीत शेकडो वर्षांपासून वंशपरंपरागत दफन करण्यात येणाऱ्या जमिनीची मालकी खासगी असल्याने लिंगायत स्मशानभूमीच्या वापरास प्रतिबंध करण्यात आला आहे. मागील आठ वर्षांपासून वांगी येथे गट नंबर १५९९ व २४६९ या स्मशानभूमीच्या जागेचा वाद सुरू असल्याने मृतांवर अंत्यसंस्कासाठी जागा उरलेली नाही. या जागेला कुंपण आहे. स्मशानभूमीसाठी जागा संपादित करण्याच्या मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णय प्रलंबित असल्याने स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार बंद करण्यात आले आहेत.