सांगली : महापालिकेच्यावतीने कोरोना रुग्णांसाठी दोन सेंटर सुरू करण्यात आली आहेत. या दोन्ही सेंटरमध्ये १५० हून अधिक अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र रुग्णांची सेवा करत आहेत. आतापर्यंत ७०० हून अधिक कोरोना रुग्ण या सेंटरमधून बरे होऊन घरी परतले आहे. सर्वच रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.
महापालिकेच्यावतीने मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड सेंटर असे दोन केंद्र चालविली जात आहेत. कोविड सेंटरमध्ये १३२ ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे तर दुसऱ्या सेंटरमध्ये होम आयसोलेशनची सोय नसलेल्या रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था केली आहे. गेल्या महिन्याभरापासून या दोन्ही सेंटरमध्ये जिल्ह्यासह परराज्यांतील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत ६०६ रुग्ण या दोन्ही सेंटरमध्ये दाखल झाले होते. त्यापैकी ५२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर २० रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या ६६ रुग्ण उपचार घेत आहेत.
या सेंटरमध्ये तीन शिफ्टमध्ये डाॅक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच महापालिकेच्या सफाई कामगारांवर स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या २० मानद डाॅक्टर, ८ तज्ज्ञ डाॅक्टर, २५ जनरल डाॅक्टर, ३२ नर्स, २४ वार्डबाॅय, ८ लॅब तंत्रज्ञ याच्यासह एक्स रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ऑक्सिजन मशिनरी तज्ज्ञ, इलेक्ट्रीकल व मॅकॅनिकल इंजिनिअर प्रत्येकी चार असे १५० हून अधिक कर्मचारी दिवस-रात्र सेवा बजावत आहेत. या केंद्रांवर मोफत जेवण, औषधोपचारासह रक्त तपासणी, एक्सरे, अँटिजन टेस्टची सोय करण्यात आली आहे.