अंजर अथणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राजवाड्यातील सत्तर वर्षांच्या पाऊलखुणा जपणारी माती, ऐतिहासिक क्षणांना कवेत घेऊन उभारलेल्या इमारती आता स्वातंत्र्य दिन व अन्य शासकीय कार्यक्रमांपासून पोरक्या होणार आहेत. अनेक वर्षांची खंडित होणारी परंपरा...आणि कार्यालयांच्या स्थलांतरातून आलेले भकासपण जपत या इमारतींना उभे रहावे लागणार आहे. ध्वजारोहणाची सत्तर वर्षांची परंपरा यंदा खंडित होऊन विजयनगरच्या नव्या मातीत रुजू होऊ पाहत आहे.क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळख असलेल्या सांगलीत नेहमीच स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जातो. पहिला स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. यानंतर सलग ६९ वर्षे हा सोहळा याच ठिकाणी साजरा करण्यात आला. आता ही परंपरा पहिल्यांदाच खंडित होत असून, ७० वा वर्धापन दिनाचा सोहळा आता विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार आहे. जुन्या चांगल्या परंपरा नव्या ठिकाणीही कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली आहे.स्वातंत्र्याचा पहिला सोहळा सांगलीतील राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर झाला होता. याठिकाणी चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांनी पहिल्यांदा याठिकाणी तिरंगा फडकवला होता. यावेळी स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील, बापूसाहेब अण्णासाहेब पाटील, डॉ. देशपांडे, जयराम कुष्टे यांच्यासह अनेक सेनानी उपस्थित होते. यावेळी पोलिसांची परेडही झाली होती. स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन करण्यात येणार आहेत, हे माहीत असूनही सांगली संस्थानात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थानचे सर्व अधिकारी व सरंजामदार उपस्थित होते. तत्पूर्वी टिळक चौकातून शालेय विद्यार्थी, नागरिक व स्वातंत्र्य सैनिकांची भव्य रॅली काढण्यात आली होती.यानंतर सलग ६९ वर्षे याठिकाणी १५ आॅगस्टला मुख्य शासकीय सोहळा साजरा करण्यात येत होता. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रोज गणेशदुर्गवर ध्वजारोहण करण्यात येत होते.आता जिल्हाधिकारी कार्यालय विजयनगर येथे नव्या इमारतीत स्थलांतरित झाल्याने प्रथमच १५ आॅगस्ट त्याठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे राजवाडा आता स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापासून पोरका होणार आहे. जुन्या इमारतीत आता केवळ ऐतिहासिक पाऊलखुणा उरणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ध्वजवंदनासाठी राजवाडा चौकात येणे सोयीचे होते. त्यांनाही आता विजयनगरला जावे लागणार आहे.साक्षीदार व्हा : काळम-पाटीलयाबाबत जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले की, काळाच्या ओघात अनेक बदल होत असतात; मात्र आम्ही नव्या ठिकाणीही जुन्या ज्या चांगल्या परंपरा आहेत, त्या कायम ठेवणार आहे. पाचशे ते सातशे नागरिक नव्या ठिकाणी ध्वजारोहणाचा सोहळा सहज पाहू शकतील, यासाठी नियोजन करणार आहे. यासाठी आम्ही जिल्हा पोलिसप्रमुख व अधिकाºयांची बैठक घेत आहे. मोठा शामियाना उभारणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन प्रशस्त इमारत उभारली असून, यामुळे चांगले प्रशासन देणे सोयीचे होत आहे. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात आणि चांगल्याप्रकारे करता येईल, यासाठीही आमचे नियोजन सुरू आहे. नवा पायंडा पाडताना कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घेत आहोत. नागरिकांनीही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे माझे आवाहन आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता सहकार व पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
राजवाडा झाला स्वातंत्र्य दिनापासून पोरका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:39 AM