सांगली : कृष्णा नदीच्याप्रदूषणाने मर्यादा ओलांडल्याने शुक्रवारी अंकली पुलाजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले. मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यातच मासे पकडण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.कृष्णा नदीत अनेकदा मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही त्याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केले आहे. केवळ नोटीसा बजाविल्यापलिकडे प्रदुषण रोखण्यासाठी पावले उचललेली नाहीत. महापालिका क्षेत्रातून दररोज सुमारे साडेपाच कोटी लिटर सांडपाणी नदीत मिसळते. तसेच नदीकाठच्या ग्रामपंचायतींकडून सांडपाणी नदीत सोडले जाते. गेल्या काही वर्षांत प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे.त्यात सध्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. कोयना व वारणा धरणातून पाणी सोडण्यात आलेली नाही. शुक्रवारी सकाळी सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलाजवळ लाखो मासे मृत झाल्याचे आढळून आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमूनेही घेण्यात आले आहेत. नेमके कशामुळे मासे मृत झाले, याचे कारण समजू शकले नाही.
नदीतील मासे मृत्युमुखी पडत असताना दूषित पाण्यामुळे लोकांचे जीव गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी मासे पकडण्यासाठी नदीकाठी गर्दी केली होती.