सांगली : शेरीनाल्यातून सोडण्यात येत असलेल्या सांडपाण्यामुळे कृष्णा नदी प्रदूषित होत असल्याबाबत संताप व्यक्त करीत शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीत महापालिकेच्या दारात मृत मासे टाकले. शुक्रवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर पोती भरून मृत मासे टाकले होते.संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दुपारी १ वाजता कार्यकर्त्यांनी महापालिकेत घुसून दारातच मृत मासे टाकले. काही मासे हातात घेऊन महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘एकच गट्टी राजू शेट्टी’ , ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो’ अशा कार्यकर्त्यांनी दिल्या.खराडे म्हणाले की, सध्या अंकली, उदगाव, ऐतवडे याठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत. साखर कारखाने, शेरीनाला यातून प्रदूषित व केमिकलयुक्त सांडपाणी कृष्णा आणि वारणा नदीत मिसळत आहे. त्याचा परिणाम म्हणून मासे मरण्याचे प्रमाण वाढले आहे. नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. ज्यांचे दूषित पाणी नदीपात्रात मिसळत आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी.कारवाई झाली नाही व हा प्रकार थांबला नाही, तर महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात व प्रदूषण नियंत्रण कार्यालयात मृत मासे टाकणार, असा इशारा खराडे यांनी दिला. यावेळी नगरसेवक शैलेश अडके, संदीप राजोबा, संजय बेले, विश्वास बालिघाटे, सागर मादनाईक, प्रशांत घुगे, संदीप पुजारी, शब्बीर कलेगार आदी उपस्थित होते.आयुक्तांच्या बंगल्याबाहेर आंदोलनशुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या निवासस्थानासमोर पोती भरून मृत मासे टाकले. महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सांगलीत महापालिकेच्या दारात फेकले मृत मासे, स्वाभिमानी पक्षाचे आंदोलन
By अविनाश कोळी | Published: March 11, 2023 7:04 PM