सांगली : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील पोषण आहारासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची साखर पुरविण्यात आली आहे. शुक्रवारी बालकांना दिलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत मुंगळे, किडे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने एका अंगणवाडीला भेट देऊन याचा पंचनामा केला आहे. सर्व खराब साखर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनला परत करणार असल्याचे सांगण्यात आले.
अंगणवाड्यातील बालकांना कोरोनामुळे घरपोहोच पोषण आहार दिला जातो. आहार पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनकडे आहे. सांगली शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये अंगणवाडी क्रमांक १९६ येथील बालकांना शुक्रवारी पोषण आहार म्हणून साखर, मूगडाळ, गहू, हरभरा आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी साखरेच्या पाकिटात मृत मुंगळे, किडे आढळून आले. या पध्दतीची साखर जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यांना पुरवल्याची माहिती चौकशीतून पुढे आली. आटपाडी तालुक्यातील पालकांच्याही तक्रारी आल्या आहेत. याबाबत पालकांनी महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार केली. खराब साखरेची पाकिटेही अधिकाऱ्यांना पाठविली.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांना तात्काळ तपासणी करून अहवाल देण्याची सूचना केली. यादव यांनी संबंधित अंगणवाडीतील पोषण आहाराचा पंचनामा करून साखरेची पाकिटे ताब्यात घेतली. जिल्ह्यात खराब साखरेचा पुरवठा केलेली सर्व पाकिटे परत घेण्यात येणार आहेत.
बालकांना असा दिला जातो आहार...गहू चार किलोहरभरा दीड किलोमूग डाळ एक किलोसाखर एक किलोहळद २०० ग्रॅममिरची पावडर २०० ग्रॅममीठ ४०० ग्रॅम
गरोदर मातागहू ४.४०० किलोहरभरा दोन किलोमूगडाळ १.५७५ किलोसाखर एक किलोहळद २०० ग्रॅममिरची पावडर २०० ग्रॅममीठ ४०० ग्रॅम
अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार तपासून घेतला पाहिजे. खराब असेल तर परत दिला पाहिजे. निकृष्ट आहाराचे बालकांना वाटप करण्याची गरज नव्हती. यातील दाेषींवर कारवाई करण्यात येईल. बालकांना बदलून आहाराचा पुरवठा करण्यात येईल. - संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी