येळापूर/शिराळा : काळुंद्रे (ता. शिराळा) येथील शेतकरी संभाजी बंडू उबाळे (वय ५५) यांचा शुक्रवारी गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. हे वृत्त समजताच ग्रामस्थांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती; परंतु वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याची रात्री उशिरापर्यंत दखल घेतली नव्हती. संभाजी उबाळे शुक्रवारी सकाळी भात काढणीसाठी गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या शेतात गेले होते. त्यावेळी शेजारील शेतातून आलेल्या गव्याच्या त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये उबाळे गंभीर जखमी झाले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने उबाळे यांचा मुलगा शेतात भात काढणीसाठी आला. त्यावेळी वडील मृतावस्थेत पाहून त्याला जबर धक्का बसला. याबाबतची माहिती त्याने कुटुंबीयांना कळविली. शेतात मोठ्या जनावराच्या पायाचे ठसे उमटल्याने, हा हल्ला गव्यानेच केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याच भागात चार दिवसांपूर्वी ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले होते. उबाळे यांचा मृतदेह शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वन अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत वन विभागाचे अधिकारी आले नव्हते. शेवटी अंधार पडल्यानंतर वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, ए. जी. यमगर, बी. जी. मिरजकर गावात हजर झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. गेल्या महिन्यात याच परिसरात गवा मृतावस्थेत सापडला होता. चांदोली अभयारण्यातील बिबट्या, रानडुकरे, गवे यासारखे अनेक प्राणी मानवी वस्तीत येत असल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. उबाळे हे प्रगतशील शेतकरी असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या एका मुलाचे शेडगेवाडी येथे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे, तर दुसरा मुलगा सैन्यदलात गुवाहाटी येथे कार्यरत आहे. (वार्ताहर)
गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2016 11:37 PM