लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीने सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. लोकांना आता कोरोनापेक्षा महागाईचे मरण अधिक त्रासदायी, भीतीदायक वाटत आहे, असे मत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्यावतीने सोमवारी सांगलीत इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढण्यात आली.
शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून रॅलीस प्रारंभ झाला. राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, महापालिका, राजवाडा चौक, स्टेशन चौक या मार्गावरून रॅली काढण्यात आली.
आंदोलनावेळी विश्वजित कदम म्हणाले, कोरोना काळात सामान्य जनता आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. बचत केलेले पैसे उपचारासाठी द्यावे लागले. अशा परिस्थितीत सामान्य जनतेला इंधन दरवाढ कमी करून दिलासा देण्याऐवजी केंद्र शासनाने याच काळात इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढविल्या. सध्या पेट्रोल १०५ ते १०६ रुपयांपर्यंत गेले आहे. जनतेला संकटात टाकण्याचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे लोकांना कोरोनापेक्षा महागाईची अधिक भीती वाटत आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरलो आहोत.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवा नेते विशाल पाटील, निरीक्षक संजय बालगुडे, जितेश कदम, नगरसेवक मंगेश चव्हाण, बिपीन कदम आदी सहभागी होते.
चौकट
यंत्रणांचा वापर राजकारणासाठी
विश्वजित कदम म्हणाले, केंद्र सरकार शासकीय यंत्रणांचा वापर राजकीय कारणासाठी करीत आहेत. लोकांनाही या गोष्टी समजल्या आहेत. ईडीसारख्या स्वायत्त संस्थांचा कारभार पारदर्शीपणाने चालला पाहिजे. सध्या ज्या कारवाया सुरू आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू काय आहे, हे कळत नाही.
चौकट
पालकमंत्र्यांनी अधिक लक्ष द्यावे
कोरोनाची जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर आहे. प्रशासन त्यांचे काम करीतच आहे. पालकमंत्र्यांनीही अधिक लक्ष द्यावे. आम्हीही त्यांच्यासोबत आहोत. नागरिकांनी थोडे सहकार्य करायला हवे, असे मत कदम यांनी व्यक्त केले.