कामेरी : पुणे-बंगलोर
राष्ट्रीय महामार्गावरील इटकरेफाट्यावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झालेला बिबट्या अंतर्गत रक्तस्रावाने मृत झाल्याचे इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदनानंतर दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. मादी जातीच्या या बिबट्याचे वय दीड वर्ष असल्याची माहिती शिराळा विभागाचे वनक्षेत्रपाल एस.आर. काळे यांनी दिली.
शुक्रवारी रात्री इटकरे (ता. वाळवा) येथे महामार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी या मृत बिबट्याला रस्त्यावरून बाजूला ठेवले होते. ४ जानेवारी रोजी वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक रायन पाटोळे व वनमजुरांनी या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. तो बिबट्या हाच असावा, असा अंदाज असला तरी इटकरे, येडेनिपाणी, येलूर परिसरातील महामार्गालगत व मल्लिकार्जुन डोंगर परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री एकटे शेतात पाणी पाजण्यासाठी किंवा अन्य कामासाठी जाऊ नये. गटाने फिरावे, हातात काठी व बॅटरी ठेवावी, असे आवाहन वनपाल शिंदे यांनी केले. वनविभागाने रात्री गस्त घालण्यासाठी पथक तयार केले आहे.
फोटो ओळी : इटकरे (ता. वाळवा) येथे मृत बिबट्याचा पंचनामा करताना वनविभागाचे कर्मचारी व पोलीस.