जत : धावडवाडी (ता. जत) येथे माेटारीने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर माेटारचालकाने माेटारीच्या बंपरवर अडकलेल्या बालकाला महामार्गावरून नागजपर्यंत तब्बल सहा किलाेमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.
अब्दुलसमद साजिद शेख असे मृत बालकाचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी २ वाजता घडला. याप्रकरणी माेटारचालक महादेव मधुकर कुंडले (३०, रा. जालिहाळ बु., ता. जत) याला कवठेमहांकाळ पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विजापूर - गुहागर या राष्ट्रीय मार्गावर धावडवाडी गाव आहे. येथील साजिद लालखान शेख व त्यांची पत्नी जबिन साजिद शेख हे मुलगा अब्दुलसमद याला घेऊन दुचाकीने (क्र. एमएच १० ३४९८) मळ्याकडे निघाले हाेते. यावेळी मागून येणाऱ्या माेटारीने (क्र. एमएच १२ एचएन १६७४) जांभूळवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीस जाेरदार धडक दिली. अपघातात साजिद शेख जोराने उडून रस्त्यावर काेसळले, तर त्यांची पत्नी व मुलगा माेटारीच्या बंपरमध्ये अडकून तीनशे मीटरपर्यंत फरफटत गेले. तेथे जबिन याही रस्त्यावर पडल्या. पण दाेन वर्षाचा अब्दुलसमद माेटारीच्या बंपरमध्येच अडकून राहिला. तरीही चालकाने माेटर न थांबविता भरधाव वेगाने पलायन केले.
पुढे महामार्गावरील चोरीची येथील बसस्थानकासमाेर हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी त्यास राेखण्याचा प्रयत्न केला. तरीही चालकाने माेटार वेगाने पळवली. यामुळे नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, चालकाने रस्त्याकडेला माेटार थांबवून बालकास बाजूला काढून टाकत माेटार पुढे पळवली. नागज फाट्यावर जमावाने त्याला राेखले व बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील शेख यांचे नातेवाईकही पाेहाेचले. त्यांनी अब्दुलसमदला ढालगाव येथील रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. जत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून अब्दुलसमदचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, धावडवाडी येथे रस्त्यावर पडलेल्या साजिद शेख व जबिन शेख या पती-पत्नीस नागरिकांनी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात नोंद नव्हती. अपघातग्रस्त माेटारीचा चालक महादेव कुंडले यास माेटारीसह कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.