इस्लामपूर : माणिकवाडी (ता. वाळवा) येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत लष्करी जवानांच्या २३ वर्षीय पत्नीचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास मृत्यू झाला. इस्लामपूर शहरातील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.स्नेहल रोहित खोत (वय २३, माणिकवाडी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी ताप आल्याने स्थानिक डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार घेण्यात आले. मात्र, ताप उतरत नसल्याने त्यांना इस्लामपूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे डेंग्यू आजाराचे निदान झाल्यावर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. पती रोहित मारुती खोत यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. सव्वा वर्षापूर्वी रोहित आणि स्नेहल यांचा विवाह झाला हाेता. स्नेहल यासुद्धा माणिकवाडी गावातीलच होत्या. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दीर, आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.दरम्यान, तालुका आरोग्य विभागाने माणिकवाडी गावात घरोघर सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सात जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल रात्रीपर्यंत येईल, असे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले.
Sangli: माणिकवाडीत जवानाच्या पत्नीचा डेंग्यूमुळे मृत्यू, गावात साथीची धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 5:20 PM