गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे चार महिन्यांचा असताना त्याला आणला. सांभाळ केला. शर्यतीचा सराव करून घेतला. चार-पाच मैदाने मारून त्याने लक्ष वेधून घेतले. परिसरात ‘लाल्या’ नावाने तो परिचित झाला. अनेकांनी त्याच्या खरेदीसाठी उत्सुकता दर्शविली होती. परंतु, लाल्या कुटुंबाचा सदस्य बनल्याने नकार दिला. दुर्दैवाने त्याला लम्पीने गाठले. त्याच्यावर उपचार केले. परंतु, या शर्यतीत ‘लाल्या’ दुर्दैवाने हरला.तरुण शेतकरी उत्तम जाधव यांनी चार महिन्यांच्या ‘लाल्या’ला आणले होते. जीवापाड जपलेल्या ‘लाल्या’चा लळा सर्वांनाच लागला होता. परंतु, त्याला काही दिवसांपूर्वी लम्पी आजाराने ग्रासले. जाधव यांनी शेतमजुरी करत त्याच्यावर उपचार सुरू ठेवले. परंतु, दुर्दैवाने लाल्याने साथ सोडली. त्यामुळे जाधव कुटुंबीय दुःखात बुडाले. लाल्याला विधिवत दफन करण्यात आले. माती सावडणे, दिवसकार्य सुद्धा घातले. लाल्याची एक्झिट परिसरातील अनेकांना हळहळ करायला लावणारी ठरली.
Sangli: गोटखिंडीचा लाडका ‘लाल्या’ जगण्याच्या शर्यतीत हरला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:39 AM