सांगली : मिरजेतील विद्यानगर येथील चौगुले पार्कजवळील एका सदनिकेच्या पार्किंगमध्ये मोराचा मृतदेह आढळून आला. राष्ट्रीय पक्षी मृतावस्थेत आढळून आल्याने नागरिकांनी तातडीने वनविभागास संपर्क केला. वनविभागने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी उत्तरीय तपासणी करण्यात आली असून मोराचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे समोर आले. मोराच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिरज शहराच्या उत्तरेला विद्यानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती नाही. शेतीचा भाग असल्याने मोर, लांडोरांची संख्या अधिक आहे. या भागात नागरी वस्ती वाढत चालल्याने मोरांचा अधिवास संपुष्टात आला आहे. सकाळी सातच्या सुमारास येथील चौगुले पार्कजवळ महालक्ष्मी सदनिका आहे. त्याठिकाणच्या पार्किंगमध्ये मोर मृतावस्थेत आढळून आला. काही प्राणीमित्रांनी पाहणी केली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे पथक तातडीने दाखल झाले. प्रथमदर्शनी मोराच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा नव्हती. वनविभागाकडून उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यात कोणतीही विषबाधा किंवा शिकारीचा प्रकार झाला नसल्याचे समोर आले. मोराचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.