दिलीप मोहितेविटा : साळशिंगे (ता. खानापूर) येथे रविवारी (दि.१६) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात मण्यार जातीच्या विषारी सापाने समर्थ रावसाहेब कोलेनाड (वय अडीच वर्षे, सध्या रा. साळशिंगे, मूळगाव परभणी) या बालकास दंश केला. उपचारासाठी विटा ग्रामीण रूग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरच उपस्थित नसल्याने उपचाराअभावी बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोमवारी रात्री ९ वाजता संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांना घेराव घातला.परभणी येथील रावसाहेब कोलेनाड हे साळशिंगे येथे भास्कर गायकवाड यांच्याकडे शेतमजूरीचे काम करतात. रविवारी रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा समर्थ यास मध्यरात्री मण्यार जातीच्या सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला वडील व स्थानिक नागरिकांनी विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले.परंतु, तेथे कर्तव्यास असलेले डॉ. भूषण देशचौगुले रूग्णालयात हजर नव्हते. त्यामुळे पूनम म्हेत्रे नामक परिचारिकेने समर्थ यास तातडीने मिरज शासकीय रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. खासगी रूग्णवाहिकेतून समर्थला मिरजेला पाठविण्यात आले. तोपर्यंत समर्थवर प्राथमिक उपचारही झाले नाहीत. मात्र, उपचारासाठी घेऊन जाणारी रूग्णवाहिका तासगाव येथे बंद पडल्याने रूग्णालयात पोहचण्यास आणखी पाऊण तासाचा वेळ गेला. या सर्व कालावधीत समर्थ याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच भाजपचे ब्रम्हानंद पडळकर, पंकज दबडे, निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व साळशिंगे येथील स्थानिक नागरिकांनी सोमवारी रात्री ९ वाजता विटा ग्रामीण रूग्णालयात येऊन डॉ. भूषण देशचौगुले व डॉ. विशाल नलवडे यांना घेराव घालून धारेवर धरले. परंतु, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्याशी संपर्क साधून डॉ. देशचौगुले यांना निलंबीत करून परिचारिका पूनम म्हेत्रेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.दरम्यान, परभणीहून शेतमजुरीसाठी आलेल्या गरीब कुटुंबातील समर्थचा सर्पदंशानंतर उपचाराअभावी मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूध्द तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चौकशीनंतर कारवाई करु : डॉ. विक्रमसिंह कदमसाळशिंगे घटनेबाबत आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेची चौकशी सुरू आहे. त्यात दोषी आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.