संख : जत तालुक्यातील अनेक गावांत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही झुडपे जतकरांसाठी मृत्यूचे सापळे बनली असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
तालुक्यातील रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज, जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंर्तगत आहेत. गावांना जायला डांबरीकरणाचे पक्के, खडीकरणाचे कच्चे रस्ते आहेत. यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे रस्त्याकडेला दुतर्फा काटेरी झुडपे वाढलेली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. एखादे मोठे वाहन समोरून आले तर दुसरे वाहन तेथून जाऊ शकत नाही. वाहनांना बाजू देताना अडचण होत आहे. एवढेच नव्हे तर या अरुंद झालेल्या काटेरी रस्त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्यांवरील झुडपे काढली तर रस्ते मोकळा श्वास घेतील. झुडपे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत. निधी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
चाैकट
प्रशासनाकडे मागणी
ग्रामपंचायतीला दिलेल्या फंडातून रस्त्यांवरील काटेरी झाडेझुडपे काढून टाकली तर अपघाताचे प्रमाण कमी होईल, शिवाय रस्तेही मोकळा श्वास घेतील. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याकडेची झाडेझुडपे वाढली आहेत, ती काढण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सदस्य प्रशांत कांबळे यांनी जिल्हा अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांना निवेदनाने केली आहे.
१) फोटो-२६संख१
फोटो ओळ : जत तालुक्यात रस्त्याकडेची काटेरी झाडेझुडपे काढा या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांना तुकारामबाबा महाराज, प्रशांत कांबळे यांनी दिले.
२) फोटो-२६संख२
फोटो ओळ : जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते काटेरी झाडाझुडपांनी वेढलेले आहेत.