सांगली : येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी महिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे दोन वेगवेगळ्या या घटना घडल्या. घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
रेहाना मुतवल्ली यांना पहिला अडीच वर्षाचा मुलगा आहे. त्यांची पहिली प्रसूती सिझर करुन झालेली होती. दुसऱ्यावेळी गरोदर राहिल्यानंतर खासगी डॉक्टरांनी त्यांना सिझर करण्यास सांगितले होते. त्यानुसार बुधवारी दि. ४ मार्चला त्यांना सिव्हिलमध्ये दाखल केले होते.
डॉक्टरांनी सिझर करण्यास नकार देऊन साधेपणाने प्रसूती होईल, असे सांगितले. दुसऱ्यांदिवशी गुरुवारी नातेवाईकांनी सिझर करण्याचा आग्रह केला. परंतु डॉक्टरांनी नकारच दिला. शुक्रवारी पहाटे साधेपणाने त्यांची प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रेहाना यांचा मृत्यू झाला. मुलाची प्रकृतीही चिंताजनक बनली होती. मात्र त्याचाही काही वेळानंतर मृत्यू झाला.
पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक प्रताप पोमण यांनी नातेवाईकांना शांततेचे आवाहन केले. अधीष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, पोलीस अधिकारी व रेहाना यांचे नातेवाईक यांची संयुक्तपणे बैठक झाली. बैठकीत या प्रकरणाच्या चौकशीसाठी वैद्यकीय समिती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. विच्छेदन तपासणी करुन रेहाना यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दुसऱ्या घटनेतील लक्ष्मी पाटील यांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांचे पहिले सिझर झाले होते. गुरुवारी दुपारी त्यांना प्रसूतीसाठी सिव्हिलमध्ये दाखल केले होते. नातेवाईकांनी सिझर करण्याची मागणी केली. डॉक्टरांनी नकार दिला. शुक्रवारी पहाटे साधेपणाने त्यांची प्रसूती झाली. त्यांना मुलगा झाला होता. परंतु मलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची चौकशी करावी, अशीही मागणी केली. त्यानुसार वैद्यकीय समिती याचीही चौकशी करणार आहे.आठ बाटल्या रक्तमहिलेसह दोन अर्भकांचा मृत्यू झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रसेचे संजय बजाज, विनया पाठक, दीपक माने, संध्या आवळे, आयेशा शेख, अनिता पांगम, संध्या आवळे यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतले. डॉक्टरांना जाब विचारला. पण डॉक्टरांनी त्यांना काहीच उत्तर दिले नाही.
विनया पाठक म्हणाल्या, रेहाना यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर नातेवाईकांकडून रक्ताच्या आठ बाठल्या मागवून घेतल्या. महागडी औषधेही बाहेरुन आणण्यास सांगितले. तरीही रेहानाचा जीव वाचविता आला नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनेप्रकरणी प्रसूती कक्षातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे.पोलिसांकडून तपासविश्रामबाग पोलीस ठाण्यात रेहाना यांच्या अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृत्यूची चौकशी सुरु केली आहे, असे निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले. ते म्हणाले, विच्छेदन तपासणीचा अहवाल व वैद्यकीय समितीचा चौकशीनंतर काय अहवाल येतो, हे पाहून तपास करण्यात येईल.