मिरज : मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांच्या बदलीस मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. मारामारी प्रकरणात भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याने उपअधीक्षकांची बदली झाल्याची चर्चा सुरू आहे. उपअधीक्षक भारती बदलीच्या आदेशास प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहेत.चार महिन्यांपूर्वी मिरज उपविभागाकडे नियुक्ती झालेले पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची तडकाफडकी जतला बदली करण्यात आली असून, त्यांच्याजागी नांदेड येथील अनिल पवार यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. चार महिन्यातच उपअधीक्षक भारती यांच्या अचानक केलेल्या बदलीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आ. सुरेश खाडे व अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन, ही बदली रद्द करण्याची मागणी केली. दोन महिन्यांपूर्वी मिरजेत भाजप व राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत घडलेल्या मारामारीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानेच उपअधीक्षक भारती यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. आ. खाडे यांनी भारती यांच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करून, याबाबत गृहसचिवांची भेट घेणार असल्याचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना सांगितले.बुधवारी केदार माने, मनोहर कुरणे, गजेंद्र कुळ्ळोळी, धनराज सातपुते, अमजद जमादार, फारूख बागवान, जहिर मुजावर, रवी अटक, मुस्तफा बुजरूक, जावेद पटेल, पप्पू शिंदे, महेश कांबळे, निहाल शरीकमसलत, जैलाब शेख, सुनील मोरे आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अतिरिक्त अधीक्षकांची भेट घेऊन, बदली रद्द करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला.
उपअधीक्षक अनिकेत भारती यांच्या बदलीमुळे मिरजेत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:00 AM