सांगली : सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या कुंपण भिंतीशेजारी असलेली खोकीधारकांची अतिक्रमणे काढताना शनिवारी खोकीधारक व महापालिका अधिकाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याची तक्रार खोकीधारकांनी केली. खोकीधारकांनी बाहेर आलेले शेड स्वत:हून काढले, तर महापालिकेने रस्त्यावरील कट्टे फोडून काढले. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सकाळी सुरू झाली. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाच्या आवारात ही मोहीम सुरू झाल्यानंतर अधिकृत खोकीधारक एकत्र झाले. त्यांनी यापूर्वी याच ठिकाणी बसविलेल्या पक्क्या गाळेधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी ते गाळे न्यायालयीन आदेशानुसार वसविण्यात आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त खोकीधारकांनी अन्य खोक्यांवरही कारवाई न करण्याचा हट्ट धरला. पोलिसांशीही त्यांचा वाद झाला. शेवटी पोलिसांनी सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांना बोलावून घेतले. यावेळी वाघमारे व खोकीधारकांत वाद झाला. काही काळ कारवाई थांबविण्यात आली. खोकीधारक संतप्त झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. शेवटी खोकीधारकांनी स्वत:हून छताचे अतिक्रमण काढून घेण्याचे मान्य केले. त्यांना अर्धा तासाचा अवधी देण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कट्टे पाडले. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईवेळी मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सत्याळ यांनी विरोध केला. सचिन बन्ने, सुमन गावडे, मुख्तार बागवान, इम्रान खानापुरे, अनिल माने या खोकीधारकांनीही पालिकेविरोधात दुजाभाव केल्याची तक्रार केली. (प्रतिनिधी)
सांगलीत अतिक्रमणे काढताना वाद
By admin | Published: January 03, 2016 12:53 AM