कुपवाड : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप आघाडीबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. आघाडीचा निर्णय दोन्ही पक्षाचे श्रेष्ठीच घेतील, असे सांगत शुक्रवारी राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी आघाडीचा चेंडू मुंबईकडे टोलावला.शामनगर येथे विविध विकास कामाचे उद््घाटन व आरक्षणबाधित रहिवाशांना एनए प्रमाणपत्राचे वाटप जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर हारूण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, नगरसेवक संतोष पाटील, युवराज गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी प्रभागाचे नगरसेवक विष्णू माने यांनी स्वागत करीत विकास कामांचा आढावा घेतला.जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशात महागाई वाढली आहे. पूर्वी भाजपचे नेते मोर्चे काढत होते. पण आता पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली. मोर्चे काढणारे भाजपचे नेते कुठे आहेत?, असा सवाल केला. भाजपने निवडणुकीपूर्वी धनगर, मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते पाळले नाही. सामाजिक प्रश्नावर त्यांना उत्तर देता येत नाही. जनतेची फसवणूक सुरू आहे. त्यांच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करू.महापालिकेने घरे झालेल्या जागेवरील आरक्षण उठविण्याचा ठराव केला आहे. तो निर्णय नागरिकांना दिलासा देणारा असल्याचेही पाटील म्हणाले.महापौर हारूण शिकलगार म्हणाले की, कुपवाड ड्रेनेज योजनेचा ठराव केला आहे. लवकरच योजनेला मंजुरी मिळेल. पाच वर्षात महापालिकेच्यावतीने ७० कोटीची रस्त्याची कामे झाली आहेत. जलशुद्धीकरण केंद्राची १६ ला चाचणी होणार आहे. त्यामुळे सांगली व कुपवाडला शुद्ध पाणी मिळेल, असे सांगितले.जयश्रीताई पाटील यांची अनुपस्थितीमहापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाविषयी उत्सुकता होती. पण काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या गैरहजेरीत महापौर शिकलगार व गटनेते जामदार यांनी मात्र हजेरी लावली होती.
आघाडीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:15 AM