सांगली : विधानसभेच्या लढाईसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या, बुधवारी संपत आहे. त्यामुळे रणांगणाचे अंतिम चित्र उद्या दुपारी स्पष्ट होईल. बंडखोर व अन्य उमेदवारांची गर्दी जास्त होऊ नये म्हणून सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न चालविले आहेत. या नेत्यांचा आज, मंगळवारचा पूर्ण दिवस बंडखोरांच्या मनधरणीत गेला. जिल्ह्यातील आठ जागांसाठी तब्बल २२५ उमेदवारांनी ३५९ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांची सर्वाधिक गर्दी सांगलीत आहे. येथे ३८ उमेदवारांनी ६७ अर्ज दाखल केल्याने अधिक चुरस आहे. यंदा विक्रमी अर्ज दाखल झाल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांपासून बंडखोरांना समजविण्यासाठी नेत्यांची कसरत सुरू आहे. बहुतांश मतदारसंघांत अपक्ष व बंडखोरांची गर्दी आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आज दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत बंडखोरांची समजूत काढण्यात चारही पक्षांचे नेते व्यस्त होते. बहुतांश बंडखोरांना शांत करण्यात या नेत्यांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात यंदा बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होतील. याबाबतचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
अंतिम रिंगणाचा आज फैसला
By admin | Published: October 01, 2014 1:07 AM