सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विभागातील संजय गणपती कांबळे (वय ४८, रा. हरिपूर, ता. मिरज) या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. २ जानेवारीला जिल्हा न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. दरम्यान, पोलिसांचा तपास अजूनही सुरूच आहे. गेल्या महिन्यात पेपरफुटीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेविका शाहीन जमादार व शाकीरा उमराणी या दोघींना अटक केली होती. न्यायालयाकडून त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. तेव्हापासून पोलिसांनी एकाही संशयितास नव्याने अटक केली नाही. त्यावेळी तिसरा संशयित म्हणून संजय कांबळे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पण पोलीस अजूनही याचा इन्कार करीत आहेत. अटकेची कारवाई टाळण्यासाठी कांबळेने जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाला होता. त्यावर २८ डिसेंबरला अंतिम सुनावणी ठेवली होती. पण ती २ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (प्रतिनिधी) आठजण न्यायालयात या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणखी आठजणांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर ३ जानेवारीला सुनावणी होणार आहे. आणखी दहा ते बारा संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.
कांबळेच्या जामिनावर २ जानेवारीला निर्णय
By admin | Published: December 29, 2015 12:35 AM