मिरज : मिरज तालुक्यात यापुढे वृक्ष लागवड व संगोपनाची हमी दिल्याशिवाय ग्रामपंचायतीतून विवाह नोंदणी होणार नाही व दाखलाही मिळणार नाही. मिरज पंचायत समिती सभेत हा निर्णय घेऊन ग्रामपंचायतींना या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या छतावरील पाणी अडवून पाणी जिरविण्याची मोहीम सुरु करण्यात येणार आाहे. मिरज पंचायत समितीपासून त्याची सुरुवात होणार असल्याचे पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील यांनी सांगितले.
दुष्काळाची तीव्रता कमी करण्याच्या उपाययोजनेबाबत उपसभापती पाटील यांच्या संकल्पनेनुसार दुष्काळावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यापुढे वृक्ष लागवडीसाठी नवविवाहितांची विवाह नोंदणी व दाखला देण्यासाठी ग्रामपंचायतीस वृक्ष लागवड करून त्याच्या संगोपनाची हमी द्यावी. प्रत्यक्ष वृक्ष लागवड केल्यानंतर नोंदणी करून दाखला द्यावा. जे वृक्ष लागवड करणार नाहीत, अशांची विवाह नोंदणी करू नये, असा ठराव मासिक सभेत करण्यात आला. पाण्यासाठी कृष्णा नदीवर अवलंबून रहावे लागते. जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसह शासकीय कार्यालयाच्या छतावर पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यात येणार आहे. पंचायत समितीपासून हा उपक्रम राबविण्यात येणार असून, पाणी अडविण्याबाबत ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात येणार आहेत. या दोन्ही ठरावांचे सदस्यांनी समर्थन देऊन स्वागत केले. या निर्णयामुळे नवविवाहितांना ग्रामपंचायतीत विवाह नोंदणी व दाखल्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करावे लागणार आहे.
जिल्ह्यासाठी आदर्श उपक्रमदुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड व कार्यालय, घराच्या छतावरील पाणी अडविण्याची संकल्पना सभेत मांडली. विवाह नोंदणीसाठी नवविवाहित दाम्पत्यांना वृक्ष लागवडीच्या सक्तीचा निर्णय झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी कार्यालयाच्या छतावरील पाणी अडविण्याची सुरुवात मिरज पंचायत समितीतून होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींनी हा प्रयोग राबविण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. दोन्ही उपक्रम जिल्ह्यात आदर्श ठरतील, असे उपसभापती विक्रम पाटील यांनी सांगितले.