सांगली : जिल्ह्यातील निर्बंध शिथिलतेबाबत शासनाकडून सोमवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. जिल्ह्यात अद्यापही कोरोनास्थिती कायम आहे. ज्या भागात ती नियंत्रणात आहे, त्या भागात निर्बंध शिथील करण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, सोमवारी यावर निर्णय होऊ शकला नाही.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कायम असून, पॉझिटिव्हिटी रेटही १० टक्क्यांवर आहे. मात्र, व्यापाऱ्यांकडून व्यवहार सुरु करण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे ज्या भागात कोरोना स्थिती गंभीर आहे, तो भाग वगळून इतर भागातील व्यवहार सुरळीत करण्यासाठी पालकमंत्री पाटील प्रयत्नशील आहेत. मात्र, यासाठी शासनस्तरावरुनच निर्णय अपेक्षित आहे.
मुख्यमंत्र्यांशी अथवा सचिव स्तरावरुन यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक होणार, अशी शक्यता होती. मात्र, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे यंत्रणा त्यात व्यस्त असल्याने याबाबत बैठक आणि निर्णयही होऊ शकला नाही.
जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवतानाच पुढील आदेश होईपर्यंत ते कायम राहतील, असे सांगितले आहे. दोन दिवसात निर्बंध शिथिलतेबाबत निर्णय अपेक्षित आहे.