सांगली : जिल्हा बँकेच्यावतीने व्यवसाय वृद्धीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. एन.पी.ए. कमी करुन वसुलीला प्राधान्य देणे, ठेवी वाढविणे तसेच गुंतवणुकीबाबतचा आराखडा तयार केला जाईल. सहभाग योजनेतून अन्य जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्ज देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नोकर भरती घेण्याचाही निर्णय झाला.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक गणपती सगरे, विक्रम सावंत, महेंद्र लाड, प्रताप पाटील, शिकंदर जमादार, कमल पाटील, श्रद्धा चरापले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग, सरव्यवस्थापक मानसिंग पाटील उपस्थित होते. बैठकीत मुख्य लेखापालांकडून वर्षाचा आढावा घेण्यात घेऊन अॅक्शन प्लॅन तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
दरवर्षी मार्च महिन्यात वसुलीची मोहीम राबविली जाते. मार्चएण्डला गडबड करण्याऐवजी डिसेंबरपासून वसुलीला जोर दिल्यास फायदा होणार आहे. काही साखर कारखान्यांची वसुली थकली आहे, त्याबाबतही चर्चा करण्यात आली. एन. पी. ए. कमी करण्यासाठी वसुलीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेवी वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, याशिवाय ठेवी गुंतवणुकीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या.जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला सहकार विभागाने मंजुरी दिली आहे.
बँकेत सध्या ९८७ कर्मचारी कार्यरत असून, ४५५ पदे रिक्त आहेत. भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, संचालक मंडळानेही हिरवा कंदील दर्शविला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राष्ट्रीयस्तरावरील संस्थेला प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार आयबीपीएस, सीपॅक, एनआयबीईआर, व्हॅनिक्रॉम या चार संस्थांना बॅँकेने पत्र पाठविले होते. यापैकी आयबीपीएस, सीपॅक, एनआयबीईआर या तीन संस्थांनी प्रक्रिया राबविण्याची तयारी दर्शविली आहे. एका संस्थेमार्फत भरतीप्रक्रिया राबवावी लागेल.
भरतीसाठी अर्ज मागवण्यापासून ते निवड यादी जाहीर करण्यापर्यंतची कार्यवाही संबंधित संस्थेमार्फत होणार आहे. या तीन संस्थांमधून कोणत्या संस्थेची निवड करायची, हे ठरवण्याचे अधिकारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संचालक मंडळाची सभा होणार असून, तिन्ही कंपन्यांना चर्चेसाठी बोलाविण्यात येणार आहे. त्यामध्ये शिक्कामोर्तब होईल. पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० कर्मचाºयांची भरती होईल, असे संकेत मिळत आहेत. नवीन वर्षात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिन्यात भरतीची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले.परजिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जपरजिल्ह्यातील साखर कारखाने कर्ज देण्याची मागणी करीत आहेत. त्या कारखान्यांना सहभाग योजनेतून कर्ज देण्याचा विचार केला जात आहे. कर्ज वाटपासाठी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेशी चर्चा करण्यात आली आहे. साखर कारखान्यांच्या सहभाग योजनेतून कर्ज देण्याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी चर्चाही सुरु असल्याचे असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी यावेळी सांगितले.