कसबे डिग्रज :
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे पाचजण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे संचारबंदीचा निर्णय आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला.
संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. गावामध्ये विनाकारण फिरणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस कारवाई करण्यात यावी. ज्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना शासकीय नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे, अशा व्यावसायिकांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. भाजीपाला, किराणा दुकान व अत्यावश्यक सेवा नियम पाळून सुरू असावेत. गावामध्ये चौकाचौकांत तरुणांची गर्दी वाढत असून, मोठ्या प्रमाणात मावा विक्री होत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या लोकांमुळे रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यांच्यावर कारवाईचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आनंदराव नलावडे, सरपंच किरण लोंढे, तलाठी के. एल. रूपनर, वैद्यकीय अधिकारी शरद कुंवर, ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे, कुमार लोंढे, सागर चव्हाण, संजय शिंदे उपस्थित होते.