जैन समाजाच्या प्रश्नांवर अधिवेशनापूर्वी निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 12:39 PM2022-05-16T12:39:43+5:302022-05-16T12:40:15+5:30
कोणत्याही राज्याने एखाद्या समाजासाठी चांगले काम केले असेल, तर ते अन्य राज्यांनी स्वीकारायला हवे. त्यामुळे कर्नाटकने जर जैन समाजासाठी काही योजना आणल्या असतील, तर महाराष्ट्रही अशा योजनांबाबत कमी पडणार नाही.
सांगली : कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्रही जैन समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात कमी पडणार नाही. समाजाच्या ज्या मागण्या व प्रलंबित प्रश्न आहेत, त्यांच्याविषयी विशेष बैठक घेऊन पावसाळी अधिवेशनापूर्वी निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दिले.
सांगलीच्या कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित दोनदिवसीय अधिवेशनात रविवारी सकाळी मुख्य सोहळ्यात पवार बोलत होते. यावेळी शेठ रा.ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगच्या नवीन वास्तूचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जलसंपदामंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजयकाका पाटील, आ. अनिल बाबर, आ. सुमनताई पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. अरुण लाड, कर्नाटकचे आ. अभय पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश हुक्कीरे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, कोणत्याही राज्याने एखाद्या समाजासाठी चांगले काम केले असेल, तर ते अन्य राज्यांनी स्वीकारायला हवे. त्यामुळे कर्नाटकने जर जैन समाजासाठी काही योजना आणल्या असतील, तर महाराष्ट्रही अशा योजनांबाबत कमी पडणार नाही. येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आम्ही एक विशेष बैठक बोलावून शक्य तेवढे प्रश्न सोडवून समाजाच्या मागण्यांविषयी चांगले निर्णय घेऊ. अधिवेशनात येऊन केवळ घोषणा व ठराव करण्यात काहीच अर्थ नसतो. ठोस निर्णय घेण्यास मी नेहमी प्राधान्य देतो.
जयंत पाटील म्हणाले की, जैन समाजातील मोठा वर्ग सध्या अल्पभूधारक झाला आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शांतिसागर महाराजांच्या आचार्यपदाच्या शताब्दीचा महोत्सव पुढील वर्षी करण्यासाठी सरकार सर्व ती मदत करेल.
उदय सामंत म्हणाले की, शिवाजी विद्यापीठातील महावीर अध्यासनासाठी सात कोटी रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर आचार्य शांतिसागर महाराजांचे पुस्तकही सर्व ग्रंथालयांमध्ये ठेवण्यात येईल.
प्रास्ताविक राजेंद्र पाटील-पाटील यड्रावकर यांनी केले. यावेळी माजी आमदार शरद पाटील, सभेचे अध्यक्ष रावसाहेब दादा पाटील, भालचंद्र पाटील, दत्ता डोर्ले, चेअरमन रावसाहेब पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. एन.डी. बिरनाळे, सागर वडगावे, हेमंत लठ्ठे, डॉ. भरत लठ्ठे आदी उपस्थित होते.
राजू शेट्टींचा आम्हालाच पाठिंबा
जयंत पाटील म्हणाले की, अद्याप राजू शेट्टींचा आम्हालाच पाठिंबा आहे, असे आम्ही मानतो. माझ्या मतदारसंघात मी विधानसभेला उभारलो आणि शेट्टी खासदारकीला उभारले तरी त्यांना व मला जैन समाजाची खूप मते मिळतात. या त्यांच्या वाक्यावर उपस्थितांत हशा पिकला.
आचार्यपदाची शताब्दी करणार
राजू शेट्टी म्हणाले की, विसाव्या शतकात कोणीही आचार्य नव्हते. त्यावेळी शांतीसागर महाराजांना समडोळीत १९२४ मध्ये आचार्यपद देण्यात आले होते. पुढील वर्षी त्याची शताब्दी असल्याने सरकारने त्याला मदत करावी.