सांगली : तीन आठवड्यापूर्वी महापूराच्या सावटाखाली असलेल्या सांगली शहराला दिलासा मिळाला खरा, पण आता कृष्णेतील पाण्याची पातळी पाच फुटापर्यंत खाली आल्याने नव्या संकटाची चाहूल लागली आहे. सध्या तरी शहराला पाणी टंचाईची शक्यता नसली तरी भविष्यात या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे.
जुलै महिन्यात शहरावर पुराचे सावट होते. पाण्याची पातळी ३२ फुटापर्यंत गेली होती. पण नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने पाणी पातळी घटू लागली. त्यात कोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. कडेगाव, खानापूर तालुक्यासाठी वरदान टेंभू, ताकारी सिंचन योजनेतून पाणी उपसा सुरू आहे. दिवसरात्र सुरू आहेत. त्यामुळे सांगलीपर्यंत नदीपात्रातील पाणी कमी झाले आहे. सध्या आयर्विन पुलाजवळ चार फुट नऊ इंच पाणी पातळी आहे. महापालिकेच्या जॅकवेलजवळही पाणीसाठा आहे. त्यामुळे तुर्तास पाणी टंचाईचे संकट नसल्याचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले.