कोकरुड : शिराळा पश्चिम भागातील वारणा पाणलोटसह चांदोली धरण परिसरात शनिवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती कायम होती. आरळा, मराठवाडी, काळुद्रे, मोहरे, खुजगाव, चिंचोली, कोकरुड येथील घरे अद्याप पाण्याखाली असून चार ठिकाणी राज्यमार्गावर पाणी आहे.
सोमवारपासून सुरुवात असलेल्या पावसाने बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस ढगफुटीसदृश पाऊस आणि चांदोली धरणातून २८ हजार क्यूसेकपेक्षा जास्त विसर्गामुळे वारणा नदीला पूर आला होता. शनिवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूरपरिस्थिती कायम होती.
आरळा-शितूर, चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे, बिळाशी-भेडसगाव या पुलावरती पाणी आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत आरळा बाजारपेठेतील दुकाने आणि घरात पाणी होते. मराठवाडी, काळुद्रे येथील उबाळे वस्ती, मोहरे, खुजगाव, चिंचोली, कोकरुड येथील खंदक गल्ली, शिंदे गल्ली येथील दीडशेहून अधिक घरात पाणी होते. आरळा, मोहरे, कोकरुड, बिळाशी येथील राज्यमार्गावर अजूनही पाणी असल्याने वाहतूक बंद होती.