सहकारावर स्वाहाकाराची काजळी चढलेली असताना, सगळीकडे पतसंस्था या शब्दाची टवाळी होत असताना, एका सामान्य माणसाने पोटतिडकीने आणि तर्कशुद्ध जबाबदारीने केलेल्या कर्तव्यातून सांगलीतील श्री जगवल्लभ पतसंस्थेने राखेतून ‘फिनिक्स’सारखी भरारी घेतली. १९९६ मध्ये २५ कोटींच्या थकबाकीच्या ओझ्याने दबून गेलेल्या जगवल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी अंगावर घेऊन, आज या संस्थेला नावा-रुपाला आणणाऱ्या सांगलीच्या सहकार पंढरीतल्या या वारकऱ्याचं नाव आहे... ए. डी. पाटील. ए. डी. पाटलांनी ‘जगवल्लभ’ला उर्जितावस्था तर आणलीच, पण दिशाहीन झालेल्या पतसंस्थांना नवा आश्वासक सुख-समृद्धीचा मार्ग दाखविला. त्यासाठी महाराष्ट्रभर जाऊन विकलांग पतसंस्थांना मार्गदर्शनाची संजीवनी दिली. शासनाने पतसंस्था व बॅँकांवर लादलेल्या अन्याय्य नियमांविरुद्ध चिवट झुंज देत, त्यातील सत्यासत्यता पटवून देत, अनेक नियम बदलून सहकारी चळवळीसमोरचे अडथळे बाजूला करण्यात ए. डी. पाटील हे बिनीचे शिलेदार ठरले आहेत.केवळ अपूर्व आत्मविश्वास आणि श्रमाला प्रतिष्ठा देणारी बाणेदार वृत्ती घेऊन ए. डी. पाटलांनी आयुष्यात येणारी प्रत्येक भूमिका चोख बाजवली आहे. हॉटेलातला वेटर, स्टिल कारखान्यातला हेल्पर, वॉचमन, शिपाई अशी खडतर वळणे घेत ए. डी. पाटील हे श्री लक्ष्मी महिला सहकारी बॅँकेत १९७९ मध्ये कारकुन म्हणून रुजू झाले. आपला आत्मविश्वास, ‘शांतिनिकेतन’च्या ‘कमवा आणि शिका’ या संस्कारातून आलेली श्रमावरील श्रद्धा आणि संकटापुढे काळ होऊन उभे ठाकण्याची जिद्द, या जोरावर त्यांनी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करीत आयुष्याची काट्याकुट्यांची पाऊलवाट सर्व हिताचा राजमार्ग बनविली आहे.सहकार टिकला तरच महाराष्ट्रातील सर्वसामान्याचे आयुष्य आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे होणार आहे. या चळवळीत पुढारीपणासाठी किंवा मिरविण्यासाठी येण्याचे दिवस आता संपले आहेत. सहकारी कायद्याचे अचूक ज्ञान, नेमके अनुशासन आणि व्यवहारातील पारदर्शकता यांची सांगड नसलेल्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे सहकारी क्षेत्र बदनाम झाले आहे, त्याचे कंबरडे खचत चालले आहे, असे पाटील यांचे स्पष्ट मत आहे. सहकारसम्राटांनी आत्मपरीक्षण करून चुका सुधारून, स्वत: पारदर्शीपणाचा आदर्श ठेवत, यापुढची वाटचाल केली तरच सहकाराचा हा बसलेला हत्ती पुन्हा उभा राहू शकेल, असे परखड मत ते मांडतात. त्यांनी गेली ३५ वर्षे सहकारात राहून निरपेक्ष कामातून हे सिध्द केले आहे. जगवल्लभ पतसंस्थेचे सरव्यवस्थापक म्हणून गेली २० वर्षे त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेली जबाबदारी लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २०१२ मध्ये शिर्डी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत ‘दीपस्तंभ’ हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचाच जणू गौरव केला आहे.‘सहकार’ हे संघटनेच्या बळावर पुढे जाणारे आणि समृद्धी आणणारे क्षेत्र आहे. त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद व ग्राहक या सर्वांनीच त्यांच्या निर्मळ आणि सचोटीच्या कर्तृत्वाला नेहमीच पाठबळ दिले. त्यामुळेच शून्यातून समृद्धीचा श्रमयोग साकार होऊ शकला, असे त्यांचे प्रांजळ मत आहे.‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती त्यांनी, समाजातील विविध संस्थांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या लिलया पार पाडताना अनेकवेळा सत्यात उतरवून दाखवली आहे. मराठा समाज सांगली, मराठा सोशल ग्रुप, पतसंस्थांचे फेडरेशन, भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, ‘रयत’चे कर्मवीर भाऊराव पाटील इंग्लिश स्कूल, मराठा पतसंस्था, ज्ञानदीप वाचनालय (करोली एम.) अशा अनेक संस्था आणि सांगलीत होणारे साहित्य संमेलनासारखे विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यातील त्यांचा उत्साह, समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड आणि यातून तळमळ नेहमीच दाखवून देत आहे. समाजातील अन्याय व अंधश्रद्धा, परंपरांना छेद देणारे निर्णय त्यांनी स्वत:च्या कृतीतून सिद्ध केले आहेत. त्यामध्ये पाचव्या दिवशीच उत्तरकार्य, हुंडाविरोधी मोहीम अशा पुरोगामी घटनांचा समावेश आहे. एका मुलीनंतर कुटुंब नियोजनाचा निर्णय घेऊन, कुलदीपकासाठी ऊर बडविणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. विधवा आणि विधुरांचे विवाह घडविण्यातही ते पुढाकार घेतात.दैनंदिन काम हाच परमेश्वर आणि कामात बदल म्हणजे मोठा ‘विरंगुळा’, असे जीवनाचे सूत्र ठरवून ते सहकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संकटापुढं स्वत:च काळ म्हणून उभं ठाकण्याच्या मनस्वी जिद्दीमुळे आणि पारदर्शक सचोटीमुळेच समाजकार्य घडते आहे, अशी त्यांची भावना आहे. - महेश कराडकर
सहकाराची पत वाढविणारा दीपस्तंभ :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 11:07 PM