मिरज : भाजपतर्फे दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी मिरजेत संजय गांधी योजना समितीचे अध्यक्षपद नाकारल्यानंतर, मध्य रेल्वेच्या विभागीय सल्लागार समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. महामंडळावर किंवा विधानपरिषदेवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या दीपक शिंदे यांची रेल्वे सल्लागार समितीवर निवड करून, तोंडाला पाने पुसण्यात आल्याची भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे. मिरजेतील ज्येष्ठ काँग्रेस नेते आबासाहेब शिंदे यांचे पुत्र दीपक श्ािंदे यांनी दहा वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रकाशबापू पाटील व नंतर प्रतीक पाटील यांच्याविरूध्द लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते. २००९ मध्ये शिंदे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली, मात्र त्यावेळी अजितराव घोरपडे यांच्या बंडखोरीला पाठिंबा देऊन शिंदे यांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आले. संभाजी पवार यांच्या गटाच्या विरोधामुळे शिंदे यांना जिल्हाध्यक्ष पदापासून वंचित राहावे लागले. दोन वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ऐनवेळी संजय पाटील यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. केंद्रात व राज्यात पक्ष सत्तेवर आल्यानंतर, विधानपरिषदेवर किंवा महामंडळावर नियुक्तीची शिंदे यांची अपेक्षा होती. मात्र राज्य सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी काम केलेल्या शिंदे यांची मिरज ग्रामीण संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. पदांच्या निवडीवरून गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पदांची अपेक्षा असलेल्या लोकांना पदे मिळत नाहीत. ज्यांना पदे मिळताहेत, ते त्या पदांबाबत समाधानी नाहीत. कोणालाही राज्यातील मोठे पद अद्याप मिळालेले नाही. (वार्ताहर)पदाची अपेक्षाच राहिली नाही : शिंदेकिरकोळ पदावरील निवडीने संतप्त झालेल्या शिंदे यांनी हे पद नाकारल्याने, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्यांकडून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तेही पूर्ण झाले नसल्याने, आता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबाबत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, आपल्याला आता कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक शिंदे रेल्वेच्या सल्लागार समितीवर
By admin | Published: April 14, 2016 10:49 PM