सांगली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विलिंग्डन महाविद्यालयाबाबत केलेले आरोप निराधार आहेत. अपवादाने घडलेल्या काही घटनांचे भांडवल करून त्यांनी चांगल्या महाविद्यालयाची बदनामी केली आहे, असा खुलासा महाविद्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.पत्रकात संस्थेचे प्रतिनिधी, आजीव सदस्य व प्राचार्यांनी म्हटले आहे की, विलिंग्डन महाविद्यालयामध्ये मूलभूत सोयीचा अभाव, गुन्हेगारीच्या घटना, हल्ले, कँटिनमध्ये अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याबाबत तसेच प्राचार्यांच्या वर्तनाबाबत एकांगी स्वरूपाचे आरोप करून त्याची प्रसिद्धी केली आहे. हे आरोप वस्तुस्थितीस धरून नाहीत. गेले शतकभर आपल्या कामगिरीने गुणवत्तेचे मानदंड निर्माण केलेल्या विलिंग्डन महाविद्यालय तसेच महाविद्यालयाचे संचालन करणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीवर हे आरोप अन्याय करणारे आहेत.विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये वाढविण्यासाठी विविध मूल्यवर्धित अभ्यासक्रम वाजवी मूल्य घेऊन तसेच मोफतही राबविले जातात. गेल्या २५ वर्षांपासून शासनाकडून शिक्षण संस्थांना मिळणारे वेतनेतर अनुदान मिळत नाही. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून शासनाने कर्मचारी भरती बंद केल्यामुळे प्रशासन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. असे असले तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आजवर शैक्षणिक दर्जा टिकविण्यासाठी सातत्याने स्वनिधीतून कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत व अजूनही करीत आहे. महाविद्यालयाची मुख्य इमारत शंभर वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे देखभालविषयक अनेक प्रश्न वेळोवेळी उद्भवत असतात. त्यावर वेळीच उपाययोजना केली जाते.स्वच्छतागृहांची मोडतोड करणाऱ्या, दगड मारून काचा फोडणाऱ्या अपप्रवृत्तींना वेळोवेळी अटकाव केला जातो. महाविद्यालयाच्या आवारात कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन झाले नसून, विलिंग्डनशी संबंधित कर्मचाऱ्यावर हल्लाही झालेला नाही. येत्या काही दिवसात महाविद्यालय तिसऱ्यांदा नॅक मूल्यांकनासाठी सामोरे जाणार आहे. संपूर्ण इमारतीच्या विद्युत यंत्रणेचे काम सुरू आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती सुरू आहे. कँटिन सुरू नसले तरी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाची नियुक्त आहे.महाविद्यालयाच्या आवारात प्राचार्य तसेच आजीव सदस्य प्रा. राजकुमार पाटील आणि डॉ. रवींद्र कुलकर्णी हे राहतात. महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद सदस्य डॉ. लोमटे हे काम पाहतात. असे असताना अपवादाने घडलेल्या घटनांचे भांडवल करून प्राचार्य आणि संस्था प्रतिनिधींवर बिनबुडाचे आरोप परिषदेने केले आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.
‘अभाविप’कडून विलिंग्डन महाविद्यालयाची बदनामी, महाविद्यालयाकडून खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 1:30 PM