सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, सांगली) या शाखा अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले. मिरज पाटबंधारे कार्यालयात सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.तक्रारदार हे सांगलीत पाटबंधारे विभागात मोजणीदार आहेत. त्यांनी पाटबंधारे शाखेच्या म्हैसाळ येथील २०१६-१७ चे आकारणी पत्रक तयार करुन ते सही घेण्यासाठी शाखा अभियंता अकोलकर याच्याकडे सादर केले होते. अकोलकर याने सही घेण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पैसे दिले तरच सही करणार, असे त्याने सांगितले होते.
चर्चेअंती अकोलकरने दहा हजार रुपये तरी द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे मोजणीदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने तक्रारीची चौकशी केली. यामध्ये अकोलकरने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते.अकोलकरने लाचेची रक्कम सोमवारी घेऊन येण्यास सांगितले होते.
तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिरजेतील पाटबंधारे कार्यालयात सापळा लावला. दुपारी सव्वाचार वाजता मोजणीदाराकडून लाच घेताना अकोलकरला रंगेहात पकडण्यात आले. त्याची पाटबंधारे शाखेच्या म्हैसाळ कार्यालयात नियुक्ती आहे.
पण मिरजेतील शाखेचा त्याच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला मंगळवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.पाटबंधारे कार्यालयात शुकशुकाट
अकोलकरला लाच घेताना पकडण्यासाठी यापूर्वीच सापळा लावला होता. पण त्यावेळी त्याला कारवाईची चाहूल लागल्याने त्यानंतर बघूया, असे सांगून त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. पण सोमवारी तो अखेर जाळ्यात सापडला. या कारवाईनंतर पाटबंधारे कार्यालयात शुकशुकाट पसरला होता.