सांगली : मंगळवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारसंघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याच्या व त्यामुळे मतदान थांबल्याच्या घटना घडल्या. सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच या तक्रारी येण्यास सुरूवात झाल्या. त्यामुळे प्रशासनाला मात्र चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्ह्यात सुमारे ४७ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाडाच्या घटना घडल्या.गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी चालवली होती. प्रशासनाने नियोजनात कोणतीच कसर सोडली नसली तरी, मंगळवारी मतदान यंत्रांनी मात्र प्रशासनाला चांगलाच घाम फोडला. मंगळवारी सकाळी मतदानास सुरूवात झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासातच मतदान यंत्र बंद पडल्याच्या अथवा मतदान होत नसल्याच्या तक्रारी येण्यास सुरूवात झाली.
सांगली शहरातील त्रिकोणी बाग, खणभाग व गुजराती हायस्कूलमधील मतदान केंद्रांवरील यंत्रात बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारीनंतर तिथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र, यात अधिक वेळ गेल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.एकीकडे शहरातून मतदान यंत्रांबाबत तक्रारी वाढत असताना, मतदारसंघातील ग्रामीण भागात ही अडचण अधिक जाणवली. सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक ठिकाणी मतदानयंत्र काम करत नसल्याच्या तक्रारी येतच होत्या.देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील मतदान केंद्रावर तर मतदारांची रांग तर वाढलीच, शिवाय पर्यायी मतदान यंत्र येण्यासही तासाभराचा कालावधी लागला. सकाळच्या टप्प्यात चिंचणी येथेही मतदान यंत्र बंद पडले होते. त्यानंतर इरळी येथेही यंत्र खराब झाले.प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची सोय केली होती. याशिवाय पर्यायी व्यवस्थेसाठी अजून काही यंत्रे ठेवली होती. ती यंत्रे क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे होती. ज्या मतदान केंद्रातून यंत्र काम करत नसल्याबाबत तक्रारी येतील, त्याठिकाणी तातडीने पोहोचून पर्यायी व्यवस्था करण्यात येत होती.तरीही प्रक्रियेस वेळ लागल्याने मतदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात अगोदरच मतदार मळा भागातून आले होते. तसेच त्यांची शेतीचीही कामे अर्धवटच राहिल्याने व त्यात मतदान यंत्र बंद पडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी संकलित केली नसली तरी, किमान ४७ ठिकाणी ही अडचण आल्याचे निदर्शनास आले. मंगळवारच्या मतदानानंतर बुधवारी दिवसभर वेअर हाऊसमध्ये मतदान यंत्रांची पडताळणी केली. दिवसभर अधिकारीवर्ग यात व्यस्त होता. रात्री उशिरा मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँग रूम सील करण्यात आली.