लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अपुरा व कमी दाबाने पाणी येत आहे. याबाबतच्या तक्रारी वाढल्याने उपमहापौर उमेश पाटील यांनी शुक्रवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेत धारेवर धरले. येत्या आठ दिवसात नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी देण्याचे आदेशही पाटील यांनी दिले.
प्रभाग समिती एकच्या कार्यक्षेत्रातील संजयनगर, खणभाग, माळी गल्ली, राजनगर, घनश्याम नगर, जगदाळे प्लॉट, गोसावी गल्ली यासह उपनगरात गेल्या काही दिवसापासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. माळी गल्ली येथील महिलांनी उपमहापौरांची भेट घेऊन पाणी पुरवठ्याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी उपमहापौर पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी का मिळत नाही, असा सवाल करत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
याबाबत पाटील म्हणाले की, माळबंगला व हिराबाग वॉटर वर्क्स येथून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यातच जॅकवेलवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पुरेशा दाबाने पाणी देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात तीन तास पाणीपुरवठा केला जात असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात दीड ते दोन तासच नागरिकांना पाणी मिळते. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना दिली आहे. तसेच उपनगरात अनेक बोगस कनेक्शन आहेत. त्याचा सर्वे करून हे कनेक्शन बंद करण्याची सूचनाही केली आहे. माळबंगला येथे जुने पंप, पाईप मोठ्या प्रमाणात पडून आहेत. ते भंगार चोरीला जात असून त्याचा लिलाव काढण्याबरोबरच तेथे सुरक्षा रक्षक नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
माळ बंगलाजवळच पाणीटंचाई
महापालिकेचे मुख्य जलशुद्धिकरण केंद्र माळ बंगला येथे आहे पण याच परिसरात नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याचे उपमहापौर पाटील यांनी सांगितले. तर नगरसेविका शुभांगी साळुंखे यांनी पाणी राहू द्या, किमान माळ बंगल्याच्या टाकीची सावली तरी आम्हाला द्या, असा टोला अधिकाऱ्यांना लगावला.
चौकट
गळतीचे कर्मचारी अन्य विभागात
जलवाहिन्यांना लागलेली गळती काढण्यासाठी महापालिकेने मानधनावर २२ कर्मचारी घेतले आहेत. त्यापैकी ५० टक्के हून अधिक कर्मचारी कामावरच नसतात. काहींनी खोटी प्रमाणपत्रे सादर करून अन्य विभागात बदली करून घेतल्याचा आरोप उपमहापौर पाटील यांनी केला.