प्रताप महाडिक ।कडेगाव : ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे गरजेचे आहे. ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे व शेतीपिके करपून चालली आहेत.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात दुष्काळ पडला असून याची गंभीर दखल घेऊन शासनाने सिंचन योजना चालू ठेवण्याची गरज आहे. वीज बिलांच्या शुल्कामध्ये टंचाईचा कोट्यवधी रुपयांचा खर्च बचत होण्यास मदत होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी विहित वेळेत वसूल होते. त्यामुळे योजना सक्षमपणे व अविरतपणे कार्यरत राहिली. वीजबिलाच्या ८१-१९ फॉर्म्युल्यामुळे तर ही योजना अधिक सक्षम झाली. सध्या ताकारी योजनेची ९ कोटी ५० लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे. परंतु साखर कारखान्यांकडून ७ कोटी रुपयांची वसूल झालेली पाणीपट्टी येणेबाकी आहे. राज्य शासनाकडून टंचाई काळात दिलेल्या आवर्तनाची मागील आणि चालू वर्षाची ५ कोटी ८८ लाख इतकी येणेबाकी आहे. याशिवाय चालूवर्षी दिलेल्या आवर्तनाची ८१ टक्के याप्रमाणे २ कोटी इतकी वीजबिलाची रक्कम येणेबाकी आहे. यामुळे योजना सक्षम असताना, आवर्तन बंद का, असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होण्यास होणाºया विलंबाचे खापर कालवा अस्तरीकरणाच्या सुरू असलेल्या कामावर फोडले जात आहे. परंतु आवर्तन कालावधित अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी केली आहे.
चौथे आवर्तन शिल्लकचालूवर्षी ताकारी योजनेची रब्बी हंगामात दोन, तर उन्हाळी हंगामात एक अशी तीन आवर्तने पूर्ण झाली आहेत. अद्यापही उन्हाळी हंगामातील एक आवर्तन बाकी आहे. हे आवर्तनही तातडीने द्यावे, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
अजूनही साडेतीन टीएमसी पाणी हक्काचेताकारी योजनेला ९ टीएमसी पाणी मंजूर आहे. यापैकी पहिल्या तीन आवर्तनांसाठी साडेपाच टीएमसी पाणीवापर झाला आहे. योजनेच्या वाट्याचे व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अजूनही साडेतीन टीएमसी पाणी शिल्लक आहे.