तांदुळवाडी : घरातून बाहेर पडावे तर धगधगती उष्णता अन् कोरोनाचे संकट आणि नाही बाहेर पडावे तर शेतीच्या कामांचा खाेळंबा अशा अडचणीच्या उंबरठ्यावर तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी आहेत.
तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगांव, भडकंबे, नागाव, कणेगांव, भरतवाडी आदी गावांमध्ये शेतकरी एप्रिल महिन्यात मशागतीच्या कामांना सुरुवात करतात. मे महिन्यात आडसाली ऊस लागवड, भुईमूग, भात, सोयाबीन या पिकांसाठी शेत तयार करावे लागते, पण सध्या या परिसरात उष्णतेने कहर केला आहे. लोकांना बाहेर पडणे अतिशय त्रासदायक झाले आहे. त्यातच कोरोनाची धास्ती आहे. याशिवाय काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. यामुळे शेतीतील कामे खोळंबली आहेत. शेतीत टोकन व पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू असतात. यामुळे सकाळच्या प्रहरी शेतातील मशागतीचे नियोजन करायचे की बियाण्यांची खरेदी करायला रांगेत थांबायचे, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
बियाणांची खरेदी करण्यास इस्लामपूर, आष्टा, वडगांव किंवा सांगली येथे जावे लागते. सध्या सर्वत्र काेराेना संसर्ग वेगाने वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्येही धास्ती आहे.