मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी मध्यरात्री शेतात राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांच्या घरावर दरोडा पडला. चोरट्यांनी महावीर पाटील यांच्यावर चाकूहल्ला करून महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला. या घटनेनंतर चोरट्यांच्या शोधात वड्डीत पारधी वस्तीवर गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली. दरोडाप्रकरणी कल्लू भोसले ऊर्फ कलियुग (वय २५, रा. वड्डी, ता. मिरज) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मल्लेवाडी येथे बेडग-मालगाव रस्त्यावर बाळासाहेब पाटील यांची द्राक्षबाग आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आठ जणांच्या टोळीने बाळासाहेब पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी दरवाजा न उघडल्याने खिडक्यांच्या काचा फोडून दरवाजा दगडाने तोडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी पाटील कुटुंबियांना मारहाण करून दहशत निर्माण केली. चोरट्यांना प्रतिकार करणारा बाळासाहेब पाटील यांचा मुलगा महावीर पाटील (२६) यांच्या पायावर चाकूने वार करून त्यास जखमी केले. महावीर यांचे भाऊ राहुल यांनाही चोरट्यांनी मारहाण केली. घरातील महिलांना जिवे मारण्याची धमकी देत गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लुटली.
महिलांच्या गळ्यातील तीन तोळे दागिने, मोबाईल व सात हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. सुमारे अर्धा तास चोरट्यांची पाटील कुटुंबियांना हाणामारी सुरू होती. चोरट्यांनी घरातील कपाटातील साहित्य विस्कटून टाकले. पाटील यांच्या मदतीला काही आजुबाजूचे ग्रामस्थ आल्याची चाहुूल लागल्यानंतर चोरट्यांनी तेथून पलायन केले. याबाबत ग्रामीण पोलिसात राहुल पाटील यांनी फिर्याद दिली असून चोरट्यांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी महावीर पाटील यांच्यावर मिरज शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमले होते. पाटील यांच्या घरातील फरशीवर रक्ताचे डाग पडले होते. पोलिसांच्या श्वानपथकाने पाटील यांच्या घरापासून सहा किलोमीटर अंतरावर बेडग रस्त्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे.पोलिसांवर दगडफेकदरोड्याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल पोवार यांच्यासह पोलीस पथकाने चोरट्यंच्या शोधासाठी मध्यरात्री वड्डीत पारधी वस्तीवर छापा टाकला, यावेळी महिलांनी पोलीस पथकावर चटणी व दगडफेक केली. महिलांनी किशोर कदम या पोलीस कर्मचाºयाच्या हाताचा चावा घेतला. पोलिसांवरील दगडफेकप्रकरणी पोलिसांनी रेखा भोसले, जानकी भोसले, छाया पवार, छाया भोसले, मनीषा पाटील-भोसले (रा. वड्डी) या पाच महिलांना अटक केली आहे.संशयिताकडून दरोड्याची कबुलीदरोडाप्रकरणी कल्लू भोसले या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोसले हा बेळंकी येथील दोन महिलांच्या खून प्रकरणात आरोपी होता. कल्लू भोसले याने या दरोड्याची कबुली दिली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.