जत : डोर्ली (ता. जत) येथील ग्रामसेवक मारुती शिंदे यांनी अतिवृष्टीच्या पंचनाम्यात हलगर्जीपणा करून पक्षपाती पध्दतीने काम केले. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक मारुती शिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांचे प्रत्यक्षात नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे केले नाहीत. संबंधित शेतकऱ्याने पंचनामा करण्याची विनंती शिंदे यांना केली होती, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शिंदे गावात वेळेवर हजर राहत नाहीत. ग्रामपंचायतीचा सर्व कारभार खासगी उमेदवारामार्फत करत आहेत. कार्यालयीन कामाच्या वेळेत उपस्थित राहण्याबाबत वरिष्ठांनी त्यांना सक्त ताकीद द्यावी व नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुकेश पवार यांनी केली आहे.