वृक्षतोडीवर प्रतिबंध घालण्याची मागणी
जत : वन विभाग व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने नागरिकांमध्ये वृक्षतोड न करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. परंतु जिल्ह्यातील वनांचे प्रमाण वृक्षतोडीमुळे कमी झाले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झाली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दिशादर्शक फलक लावण्याची गरज
शिराळा : शिराळा तालुक्यातील विविध मार्गावरील अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची दिशा वाऱ्यामुळे बदलली आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांची फसगत होत असते. या रस्त्यावरील दिशादर्शक फलकांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष
तासगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्क वापरासह इतर सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु, अनेक नागरिक मास्क न घालता बाहेर पडत असून, गर्दीही केली जात आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
काेराेनाबाधिताचा परिसर निर्जंतुक करा
नेलकरंजी : आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पूर्वी रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाईझ करण्यात येत होता. मात्र आता केवळ ज्या घरी रुग्ण आढळला, तेथे बोर्ड लावून प्रशासन मोकळे होते; परंतु, परिसर सॅनिटाईझ करीत नाहीत. त्यामुळे रुग्ण वाढण्याची भीती आहे.
संचारबंदीला प्रतिसाद
बुधगाव : माधवनगर (ता. मिरज) येथे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या संचारबंदीला चांगला प्रतिसाद मिळाला. औषध दुकानांसह अत्यावश्यक सेवा वगळता गावातील सर्व व्यवहार बंद हाेते. नागरिकांनीही विनाकारण रस्त्यावर येणे टाळले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी औषध फवारणीही केली आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर पथदिवे बंद
सांगली : सांगली-मिरज रस्त्यावर प्रमुख चौक असलेल्या कर्मवीर चाैक ते विश्रामबाग यादरम्यानचे काही पथदिवे रात्री बंद असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. हे पथदिवे नियमितपणे सुरू ठेवावेत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा नागरिकांनी इशारा दिला आहे.