सांगली : ओबीसींच्या आरक्षणाविषयी निर्णय होईपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याची मागणी मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ओबीसी समाज स्थानिक स्वराज्य संस्थांतून हाकलला गेला आहे. शासनाने त्वरित आयोगाची नेमणूक करून न्यायासनापुढे पुन्हा बाजू मांडावी. ओबीसींनी त्यांचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य सर्व संस्थांच्या निवडणुका रद्द कराव्यात. निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाल्यास ओबीसी ऑर्गनायझेशन रस्त्यावर उतरेल. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करून ओबीसींची संख्या निश्चित केल्यास हा समाज जास्त असल्याचे निष्पन्न होईल, पण त्यांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो सहन केला जाणार नाही, असे जिल्हाध्यक्ष बादशाह पाथरवट यांनी म्हटले आहे.
यावेळी उपाध्यक्ष इरफान मुल्ला, अमिर हमजा तांबोळी, यासीन इनामदार, कबीर मुजावर, मुबारक नदाफ, एजाज हुजरे, हारूण पठाण, रफिक शेख, मुजफ्फर मुजावर, शाहीद मुजावर, सलीम बागवान आदी उपस्थित होते.