सांगली-मिरज रस्त्यावर खासगी जागेत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या परवानगीनुसार मनोरंजन नगरी सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने केवळ मनोरंजनासाठी परवानगी देताना व कोविड प्रतिबंधक नियम पाळण्याच्या अटी घातल्या आहेत. परवानगी नसतानाही येथे खाद्य पदार्थाचे स्टॉल सुरू असल्याचे मी मिरजकर फौंडेशनच्या सदस्यांना आढळले. खाद्याचे १५ ते २० स्टॉलवर गर्दी होत आहे. येथे मोठे पाळणे, टोराटोरा, टॉवर पाळणा, जायंट व्हील या पाळण्यात लहान मुले, स्त्रिया गर्दी करून बसत आहेत. या पाळण्यांचे सॅनिटायझेशन केले जात नाही व सेफ्टी ऑडिट केले नसल्याचे आढळले. पाळण्याचा अपघात झाल्यास आपत्कालीन कोणतीही व्यवस्था तेथे नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन सुरू असल्याने मनोरंजन नगरी बंद करावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिवजयंतीसह कार्यक्रमांवर प्रतिबंध घातले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने मनोरंजन नगरी बंद करून नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधितांवर कारवाईची मागणी सुधाकर खाडे, मनोहर कुरणे, सुधीर गोखले,उमेश कुरणे, आतिष अग्रवाल यांनी निवेदनाद्धारे केली आहे.