सांगली : सांगली व मिरज कोविड रुग्णालयांना शासनाच्या महालॅबला जोडून मोफत चाचण्यांची सुविधा रुग्णांना देण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. राज्यात सर्रास जिल्हा रुग्णालये महालॅबला जोडून रुग्णांना नि:शुल्क सेवा दिली जात आहे, सांगली, मिरजेत मात्र सोय नसल्याचे ते म्हणाले.
गाडगीळ म्हणाले की, काही ठिकाणी तांत्रिक बाबींमुळे जिल्हा रुग्णालये महालॅबला जोडली गेली नाहीत. सांगली व मिरज सिव्हिल रुग्णालयांचाही त्यात समावेश असून ती महालॅबला जोडण्याची गरज आहे. गोरगरीब रुग्णांना महालॅबमधील मोफत तपासण्यांचा लाभ मिळावा. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदने दिली आहेत. महालॅबमधून कोविड रुग्णांशी संबंधित डी. डायमर, ट्रोपोनीन, इंटरल्युकीन ६, एलएफटी, केएफटी, एस इलेक्ट्रोलेटटस आदी सर्व तपासण्या व चाचण्या मोफत मिळतील. अन्य रुग्णांसाठी थायरॉईड, कॅन्सर मार्कर, सिकल सेल, ॲनिमिया, गर्भवती महिलांच्या रक्त तपासण्या, यकृत, मूत्रपिंड, सोडियम, पोटॅशियम, युरिक ॲसिड, एलडीएस आदी तपासण्यांची सोय होईल. यामुळे सांगली आणि मिरज शासकीय रुग्णालयांना महालॅबच्या प्रयोगशाळेशी जोडले जावे. या प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी शासनाने दूर कराव्यात.