सांगली : जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगार बोगस आहेत म्हणून कामगारांची बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, या मागणीसाठी मंगळवारी विश्रामबाग येथील कामगार कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेमार्फत निदर्शने करण्यात आली.कॉ. शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याबाबत संघटनेने सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत चाळीस हजारापेक्षाही जास्त इमारत कामगारांची नोंदणी झाली आहे. कायद्याानुसार इमारत कामगारांची व्याख्या व्यापक आहे.
इमारत कामगारांशिवाय महाराष्ट्र सरकारने इमारती तयार करण्यासाठी २८ प्रकारच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कामगारांचा समावेशही बांधकाम कामगारांमध्ये केला आहे. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सर्व लोकांचा समावेशही बांधकाम कामगार कायद्यामध्ये केलेला आहे. त्यामुळे राज्यातील असंघटित मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा कामगारांना बांधकाम कामगार म्हणून नोंदविण्याचा अधिकार आहे.
प्रत्येक कामगारास स्वत: सरकारी कामगार आॅफिसमध्ये हजर राहून त्याला प्रतिज्ञापत्रावर सही केल्याशिवाय ओळखपत्र मिळत नाही व लाभही मिळत नाहीत. तरीही माहिती अधिकाराखाली माहिती मागण्यांचे ढोंग करून बांधकाम कामगारच बोगस आहेत, असा कांगावा करून बांधकाम कामगारांना लाभच देऊ नका, अशी मागणी काहीजण करीत आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.