विकास शहा ।शिराळा : शिराळा ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली, मात्र अद्यापही शहरात अबाल-वृद्धांना विरंगुळा म्हणून बगीचाची सोय नाही. शासकीय जागा उपलब्ध नसल्याने शहरात नेमकी कुठे बागीचाची सुविधा उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्न नगरपंचायतीला पडला आहे. शहरातील अंबामाता मंदिरामध्ये एक बगीचा आहे, मात्र याला जागेची मर्यादा असल्याने शहरातील नागरिकांना बगीचाची सोय करून देण्याची मागणी होत आहे.
शिराळा शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात वेगाने झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या गरजा वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने बाग-बगीचा यांची मोठी गरज आहे. मात्र शिराळा नगरपंचायतीच्या क्षेत्रात बगीचा नसल्याने मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या, तसेच लहान मुलांना बाहेर विरंगुळा म्हणून फिरावयास घेऊन जाणाºया पालकांची अडचण होत आहे.
बागेच्या कमतरतेमुळे नागरिक मोरणा नदी रोड, कापरी रोड, बाह्यवळण रस्ता, इस्लामपूर रोड, करमाळा रोड, मोरणा धरण रोड याठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी जातात. मात्र या मार्गांवर वाहतूक जास्त आहे. येथील अंबामाता मंदिराच्या परिसरात माजी आ. मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटनस्थळ विकास निधीतून छोटी बाग तयार केली आहे. या बागेत फूलझाडे लावली आहेत. मात्र मोठ्या झाडांची लागवड केलेली नाही. बागेची जागा लहान असल्याने चालणे, व्यायाम करणे आदी गोष्टी अशक्य आहेत. मंदिर परिसरातील बगीचाची देखभाल ट्रस्टमार्फत, तर स्वच्छता नगरपंचायतीमार्फत केली जाते. या बगीचाचा वापर लहान मुलांना खेळण्यास तसेच मोठ्यांसाठी विरंगुळा म्हणून होत आहे. नाग स्टेडियम वगळता एकही मोठी मोकळी शासकीय जागा शिल्लक नाही. नाग स्टेडियम ही जागा नागपंचमीसाठी अत्यावश्यक आहे. तेथे बगीचा करणे शक्य नाही. पाटबंधारे विभाग, भुईकोट किल्ला येथे पोलीस कॉलनीची जागा आहे. नगरपंचायतीस या जागा मिळाल्यास त्याठिकाणी बगीचा करणे शक्य आहे.
शिराळा शहरात चार ठिकाणी बगीचा करणे आवश्यक आहे. मात्र एकही शासकीय जागा उपलब्ध नसल्याने बगीचा करणे शक्य नाही. शासनाने वापरात नसलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या जागा उपलब्ध करून दिल्यास बगीचा उपलब्ध करून देता येईल.- सुनंदा सोनटक्के, नगराध्यक्षा, शिराळा नगरपंचायतमहिला, मुले, वयोवृद्ध नागरिक यांना विरंगुळ्याचे ठिकाण, तसेच सकाळी फिरणे, व्यायाम यासाठी शहरात एकही बगीचा नाही. त्यामुळे शासनाने बाग-बगीचाची सोय त्वरित करावी. वाहनांचा, चोरट्यांचा धोका पत्करून नागरिक फिरायला जात आहेत. याची दखल घ्यावी.- डॉ. नितीन जाधव, हृदयरोगतज्ज्ञ, शिराळा.शासनाकडून बगीचासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो, मात्र मोकळी जागा उपलब्ध नसल्याने, शहरात नेमका कुठे बगीचा करता येईल, हा प्रश्न आहे.- अशोक कुंभार, मुख्याधिकारी