दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. शहरात निवडणुकीची हवा होत असतानाच, सत्ताधारी भाजपकडून विकासकामांचे मार्केटिंग करून विकासाचा बागुलबुवा केला जात आहे. तर विरोधात असणाऱ्या काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरा विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांनी अद्याप मौनच धारण केले असून, वाढत्या उन्हाळ्याबरोबरच शहरातील राजकीय हवाही गरम होत असल्याचे चित्र आहे. तासगाव नगरपालिकेत खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपची एकहाती सत्ता आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. या सत्तेच्या आणि पर्यायाने खासदारांच्या माध्यमातून पालिकेत विकासाकामे करणे शक्य होत आहे. विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळत असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे. नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी नुकतीच एक पत्रकार बैठक घेऊन भाजपची सत्ता आल्यापासून २२ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगितले. हे सांगत असताना केंद्र आणि राज्यातील सत्तेचा फायदा होत असल्याचे मार्केटिंग केले. विकासकामांपेक्षा भाजपच्या सत्तेमुळेच निधी मिळाला असल्याची गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. आगामी पालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेवूनच नगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाची वाटचाल होत आहे. विरोधी काँग्रेसनेही विकासकामांच्या मार्केटिंगवर जोरदार हल्ला चढविणे ही निवडणूक संघर्षाची नांदी ठरली आहे. नगरपालिकेला शासनाकडून इतर नगरपालिकांप्रमाणेच निधी आला आहे. त्याचे खासदारांकडून केवळ मार्केटिंग केले जात असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसचे आव्हान अधोरेखित करीत पाटील यांनी भाजपच्या विकासकामांचे मार्केटिंग फसवे असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपला निवडणुकीत काँग्रेसकडून टक्कर दिली जाणार, हे आतापासूनच स्पष्ट होत असून, त्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे.
निवडणुकीची हवा अन् विकासाचा बागुलबुवा
By admin | Published: March 13, 2016 1:06 AM