फोटो ओळ : आष्टा शहरात कोरोना लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी करणारे निवेदन महेश गायकवाड, देवचंद्र आवटी, तन्वीर मुजावर, बाहुबली हालुंडे यांनी तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस आष्टा ग्रामीण रुग्णालय व दोन खासगी रुग्णालयात देण्यात येत आहेत. लवकरच १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार असून यासाठी शासनाने शहरातील विविध सामाजिक सभागृहात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी शिव सम्राट फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन दिले आहे.
कोरोना संकटाने थैमान घातले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे. दि. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधनात्मक लस देण्यात येणार आहे. आष्टा शहराची लोकसंख्या विचारात घेता लसीकरण केंद्रे वाढविणे गरजेचे आहे. तरी हुतात्मा केशवराव तळवलकर स्मारक, विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल, आनंदराव देसावळे हॉल, शाळा क्रमांक ९ बाजारवाडी याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसम्राट फाऊंडेशनच्यावतीने अध्यक्ष महेश गायकवाड, देवचंद्र आवटी, तन्वीर मुजावर, बाहुबली हालुंडे व सहकारी यांनी केली आहे.