लाेकमत न्यूज नेटवर्क
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिक्षण विभागाकडे केंद्रप्रमुखांची अनेक पदे रिक्त आहेत. सध्या केवळ दाेनच केंद्रप्रमुखांवर तालुक्याचा कारभार सुरू आहे. याचा प्रतिकूल परिणाम शिक्षण व्यवस्थेवर हाेत असल्याने केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात प्राथमिक व माध्यमिकच्या एकूण २१० शाळा आहेत. या शाळेवर नियंत्रण ठेवणे, शाळांना भेटी देणे, पगार पत्रक करणे, प्रशासकीय कामे, तांदूळ माहिती सादर करणे, अशी अनेक शालेय कामे केंद्रप्रमुखांना करावी लागतात. परंतु तालुक्यात केंद्रप्रमुख यांची संख्या दोन आहे. तालुक्यातील २१० शाळांचा कारभार पाहताना या दाेन केंद्रप्रमुखांची तारांबळ उडत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना भेटी देणे कठीण हाेत आहे. एक केंद्रात दहा ते पंधरा शाळा आहेत. अशी अकरा केंद्रे तालुक्यात आहेत.
कोरोनाच्या काळात आठ महिने शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्यापासून आजअखेर शासनाची विविध माहिती शाळांकडून ऑनलाईन मागवून ती गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्याचे काम केंद्रप्रमुखांकडे आहे. सध्याची यंत्रणा पाहता, प्रभारी कारभार आणि अनेक कामे. त्यामुळे शालेय माहिती देण्यास विलंब होताे. त्यामुळे शासनाने कवठेमहांकाळ तालुक्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट
कवठेमहांकाळ तालुक्यातील पंचायत समिती शिक्षण विभागात केंद्रप्रमुखांबरोबर लिपिकांचीही संख्या कमी आहे. एका लिपिकांनाही कामे आवरत नाहीत. एक लिपिक जर सुटीवर गेले तर पूर्ण काम थांबते. त्यामुळे केंद्रप्रमुखांबरोबर शिक्षण विभागातील कार्यालयात लिपिकांचीही पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.
चौकट
शासनाकडून विविध माहिती मागवली जाते. ते ताबडतोब भरण्याचे काम केंद्रप्रमुखाना सांगितले जाते. केंद्रप्रमुखांची संख्या कमी असल्याने ती माहिती वेळेवर देण्यास शक्य होत नाही, त्यामुळे शासनाने रिक्त पदे भरावीत.
-आर. जी. पाटील
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कवठेमहांकाळ