सांगली : जिल्ह्यातील बोगस प्रयोगशाळा चालकांविरोधात कारवाईची मागणी प्रयोगशाळा व्यवसायिकांच्या संघटनेने केली आहे. कारवाईचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन आल्यानंतरही कारवाई केली जात नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि. १४) उपोषणाचा निर्णय हेमंत चौगुले यांनी घेतला आहे.महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजीस्ट ॲण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अवैध प्रयोगशाळा चालकांना बोगस डॉक्टर ठरवून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, पॅथॉलॉजिस्टशिवाय चालवल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा अवैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर समितीची आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या संख्येने बोगस प्रयोगशाळा कार्यरत आहेत. रुग्णांच्या आरोग्याला हानीकारक असणारे चुकीचे चाचणी अहवाल देत आहेत. निदानास विलंब, चुकीचे निदान आदी कारणांनी रुग्णांच्या मृत्यूची भिती आहे.त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक व महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे आदेश शासनाने दिले होते, तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे बोगस प्रयोगशाळा जोमात सुरु आहेत. रुग्णांची फसवणूक सुरु आहे. याविरोधात हेमंत चौगुले यांनी मंगळवारपासून (दि. १४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रयोगशाळा चालक संघटनेने पाठींबा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांनी कारवाई थांबवली?संघटनेने निवेदनात म्हंटले आहे की, बोगस प्रयोगशाळांवर कारवाईचे आदेश येऊनही पालकमंत्री सुरेश खाडे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या तोंडी सांगण्यावरुन कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सांगलीत बोगस प्रयोगशाळांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ, कारवाईची मागणी
By संतोष भिसे | Published: March 11, 2023 6:36 PM