इस्लामपूर : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील ३१ वर्षीय युवकाचे पेठनाका येथे चाकूचा धाक दाखवून त्याच्याच मोटारीतून अपहरण करून पाच लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे. अपहरणाची ही घटना १९ मार्च रोजी घडली होती. दोघा संशयितांनी या युवकाकडून १० हजाराची रोकड आणि मोटार काढून घेतली.
याबाबत विकास दादासाहेब माने (वय ३१, रा. कारंदवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार अशोक कोळी (रा. घालवाड रोड, शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि आशिष माने (रा. कोल्हापूर) या दोघांविरुद्ध खंडणी, लूटमार, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील तुषार कोळी याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
विकास माने २०१७ मध्ये टेक्सटाईल कंपनीमध्ये नोकरीत होते. तेथे तुषार कोळी कॅन्टीन चालवीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. कोळी त्याच्या कामगारांचा भविष्य निर्वाह निधी माने यांच्या बॅँक खात्यावर रक्कम पाठवून ते ऑनलाईन पद्धतीने भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे वर्ग करीत होता. त्यातून तो माने यांच्याकडे पैशाची मागणी करायचा. मात्र माने हे त्याला पैसे देत नव्हते. कोळी नेहमीच बेकायदेशीर बॅँकिंग व्यवहार करण्यासाठी माने यांना धमकवीत होता.
महिनाभरापासून तुषार कोळी पैशाची मागणी करत दमदाटी करीत होता. १७ मार्च रोजी त्याने एक लाख रुपयाची मागणी करत ती न दिल्यास जिवंत ठेवणार नाही, असे धमकाविल्याने माने यांनी बॅँक खात्यावरून कोळीच्या बॅँक खात्यावर एक लाखाची रक्कम १८ मार्चला वर्ग केली.
१९ मार्चला माने त्यांच्या मोटारीमधून कऱ्हाडला निघाले होते. त्यावेळी तुषार कोळी याने फोन करून पेठनाका येथील हॉटेलजवळ दुपारी १ च्या सुमारास बोलवून घेतले. मोटारीतच त्यांच्या गळ्याला चाकू लावून कोळी याने मोटार कोल्हापूरकडे घेण्यास सांगितले. कोल्हापूर येथील मित्र आशिष माने याच्या वर्कशॉपमध्ये माने यांना उतरविले. तेथे पाच लाखांची खंडणी मागत ठार मारण्याची धमकी दिली. दोघांनी माने यांना मारहाणही केली. त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांची मोटारही काढून घेत सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांना सोडून दिले. याबाबत सोमवारी रात्री त्यांनी पोलिसात फिर्याद दिली.