सहदेव खोत पुनवत: सध्या लग्नसराई आणि गावोगावच्या यात्रा सुरू झाल्यामुळे पारंपारिक हलगी वादकांना अच्छे दिन आले आहेत . लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने मोठ्या आवाजातील ध्वनीक्षिपकांवर निर्बंध आल्याने हलगी, बँड, बेंजो वादकांचा व्यवसाय तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.ग्रामीण भागात सध्या लग्नसराईला जोरदार सुरुवात झाली आहे त्यातच गावोगावच्या यात्राही सुरू झाले आहेत. अलीकडच्या काळात यात्रा उत्सव तसेच लग्नसराई मध्ये सर्व युवकांना डॉल्बीचे वेड असते परंतु सध्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने डॉल्बी सारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांवर मोठे निर्बंध आले आहेत. त्यामुळे आपोआपच या सर्व उत्सवांमध्ये पारंपारिक वाद्यांना मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावागावात हलगी या पारंपारिक वाद्याचे वादक असून अनेक गावात हलगी बरोबरच लेझीम चा खेळ सुद्धा प्रसिद्ध आहे या सर्व समारंभाच्या निमित्ताने हलगी वादकांना लोक सध्या पसंती देताना दिसत आहेत. लग्नामधील सर्व कार्यक्रमांमध्ये हलगी वादक दिसत आहेत त्याचबरोबर यात्रेमधील पालखी मिरवणूक तसेच कुस्ती मैदानात सुद्धा हलगी वादकांना मोठी पसंती मिळत आहे.
ग्रामीण भागात जुन्या पारंपारिक वाद्यांचे रसिक अजून मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या पारंपारिक वाद्यांमुळे सर्व रसिकांची चांगलीच करमणूक होत आहे. गावोगावच्या कुस्ती मैदानात तर हे हलगी वादक उत्साह आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे
सध्या लग्न समारंभ,यात्रांमध्ये हलगी वादकांना मोठी मागणी आहे .त्यामुळे या कलावंतांना रोजगार मिळत आहे.ग्रामीण भागात आम्हा कलाकारांना चांगला सन्मान मिळत असल्याने समाधान मिळते - राजेंद्र दाभाडे, हलगीवादक, वारणा कोडोली